मद्यपींना घाबरवण्यासाठी केला गोळीबार

पणजी : सत्तरी तालुक्यात (Sattari Taluka) दोन महिन्यांमागे झालेल्या गोळीबारप्रकरणाचा (Gunshot) तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. नंदकुमार आपटे याच्या घराच्या बाजूला असलेल्या स्टोअररूममधून वाळपई (Goa Police) पोलिसांनी बंदूक (Air gun) जप्त केली.
नंदकुमार याने आपण मद्यपींना घाबरवण्यासाठी गोळीबार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. आपटे याच्याकडे शस्त्र बाळगण्यासाठी रितसर परवाना नव्हता असेही पोलिसांनी सांगितले.
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर यांनी सांगितले की, पोलिसांनी ‘फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) टीम’च्या मदतीने पोडोशे येथील झरीवाडा येथील गृहनिर्माण वसाहतीत ‘कोम्बिंग ऑपरेशन’ केले.
मालक आपटे यांच्या उपस्थितीत केलेल्या झडती दरम्यान, अधिकाऱ्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. तथापि, पोलिसांना घराशेजारी एक बंद स्टोअररूम दिसला. जेव्हा आपटेने तो उघडण्यास नकार दिला तेव्हा पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी दरवाजा तोडला.
स्टोअररूममध्ये, पथकाला एक निळ्या रंगाची बॅरल सापडली. त्यात एक लांब बॅग होती. त्यात बंदूक लपवली होती, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. त्यानंतर आपटे याच्यावर प्रश्नाची सरबत्ती केल्यावर त्याने आपण गोळी झाडल्याचे कबुल केले व घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
चौकशीदरम्यान आपण रात्री उशीरापर्यंत मद्यपान करीत बसणारे व इतर बेकायदेशीर कृत्यांत गुंतलेल्यांना घाबरवण्यासाठी गोळी झाडल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्याचे पोलीस अधीक्षक मडकईकर यांनी सांगितले. पोलिसांनी कलम ३५(३) अंतर्गत आपटे यांना नोटीस बजावली आहे.