पर्तगाळी मठानुयायांचा विक्रम : श्रीराम नामाची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
पर्तगाळी मठानुयायांचा विक्रम : श्रीराम नामाची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये

पणजी :  गोव्यातील (Goa) काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या (Shri Saunsthan Gokarn Partgali Jeevottam Math)  ५५० वर्षपूर्तीनिमित्त ५५० दिवसांत ५५० कोटी श्रीराम नामजप करण्याचे निश्च‌ित करण्यात आले होते. प्रत्यक्षात ५९४ कोटी श्रीराम नामजप पूर्ण झाला. या नामजपाची नोंद आता ’वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् (World Book of Records) मध्ये झाली आहे. ‘आशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस’सहीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झाली आहे. श्रीमद् विद्याधीश तीर्थ वडेर स्वामी यांनी धर्मसभेत याची घोषणा केली.

‘आशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस’च्या संचालकांनी स्वामीजींच्या नावावर ही नोंद करण्याची शिफारस केली होती. मात्र, स्वामींनी ही नोंद आपल्या नावावर करायला नको असे सांगितले.  श्रीराम नाम जप गौड सारस्वत समाजाच्या समाज बांधवांनी १२० जप केंद्रे व १०४ उपकेंद्रांतून केला. नामजप पूर्ण करण्याचे श्रेय त्यांना जाते. मी केवळ एक मार्गदर्शक असल्याचे स्वामीजींनी स्पष्ट केले.  नोंद करायची असल्यास ‘जीएसबी’च्या (गौड सारस्वत ब्राम्हण समाज) नावावर करावी, अशी सूचना केली. त्यानुसार तशी नोंद केल्याची माहिती स्वामींजीनी दिली. हा विक्रम म्हणजे एक लौकीक आहे. तुम्ही केलेला श्रीराम नामजप ‘वैकुंठ बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाला आहे.  श्रीरामाच्या चरणी रूजू झाला असल्याचे स्वामींनी सांगितले. 

धर्मसभेच्या सूत्रसंचालकांनी माहिती दिली की, मठ समितीने अयोध्या, पुणे व तिरूपती येथे मठ स्थापन करण्यासाठी जमीन घेतली आहे. गोकर्ण येथेही मठाचा जीर्णोद्वार करण्यात येणार आहे. परिसरात पाठशाळेचा जीर्णोद्वार करण्यात येणार आहे. परिसरात पाठशाळेचा जीर्णोद्वार करून विद्यार्थी व गुरूवर्यांसाठी निवासी सदनिका उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. धर्मसभेच्या व्यासपीठावर मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, उपाध्यक्ष शिवानंद साळगावकर, आर. आर. कामत व मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वामींच्या हस्ते थ्रीडी मॅप‌िंगचे उद्घाटन करण्यात आले. 




हेही वाचा