
वास्को : रुमडावाडा, मुरगाव (Mormugao) येथे वाहन ‘वॉशिंग सेंटर’जवळ भरधाव आलेल्या कारची (Car) धडक बसून मल्लीनाथ गौडर (५५ वर्षे) हा इसम ठार झाला. अपघातात ठार झालेला इसम आपली अॅक्टीवा स्कूटर (Activa Scooter) घेऊन रस्त्याच्या बाजूला थांबला असता ही धडक बसली.
अपघातानंतर त्यांना चिखली (Chicalim) येथील एसडीएच हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. पोलिसांनी कार चालक श्रीकृष्ण बांदेकर (२० वर्षे) या बायणा येथील युवकाविरुद्ध गु्न्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी हा अपघात घडला. ह्युडंई आय १० स्पोर्ट्स कार चालक भरधाव वेगाने कार चालवत सडा येथून वास्कोच्या दिशेने जात होता. रुमडावाडा येथे पोचला असता, रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या अॅक्टीवा स्कूटरला जोरदार धडक दिली.
त्यात स्कूटरस्वार मल्लीनाथ गौडर (एम्पीटी कॉलनी, हेडलॅंड सडा येथील रहिवासी) हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यांना चिखली येथील एसडीएच हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच मृत्यू पावला. यासंदर्भात मुरगाव पोलिसांनी कार चालक श्रीकृष्ण बांदेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संस्थेच्या २८१ व १०६ (१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सूरज नाईक करीत आहेत.