इफ्फी : व्हिएतनामी चित्रपट ‘स्किन ऑफ युथ’ला सुवर्णमयूर

५६व्या इफ्फीची सांगता : रजनीकांत यांचा विशेष गौरव, ‘बंदिश बँडिट २’ सर्वोत्कृष्ट वेब सिरीज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th November, 11:54 pm
इफ्फी : व्हिएतनामी चित्रपट ‘स्किन ऑफ युथ’ला सुवर्णमयूर

पणजी : ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी iffi) प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर (golden peacock) पुरस्कार अॅश मेफेयर दिग्दर्शित ‘स्किन ऑफ युथ’ या व्हिएतनाम, सिंगापूर आणि जपान या तीन देशांची कलाकृती असणाऱ्या चित्रपटाने पटकावला. तर यंदाचे ‘आयसीएफटी-युनेस्को गांधी’ पदक एरिक स्वेसन दिग्दर्शित ‘सेफ हाऊस’ या चित्रपटाला मिळाले. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कार ‘बंदिश बँडिट २’ या सिरीज ने जिंकला. शुक्रवारी इफ्फीचा समारोप सोहळा बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पार पडला. अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांना चित्रपट क्षेत्रात ५० वर्षे योगदान दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.


यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa chief minister Pramod Sawant), केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री एल. मुरुगन (L. Murugan), शेखर कपूर (Shekhar Kapoor), सचिव संजय जाझू , अभिनेते ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty), नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui), रणवीर सिंग (Ranvir Sing) यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अन्य कलाकार उपस्थित होते.
कार्यक्रमात ईशान्य कडील राज्ये तसेच कर्नाटकमधील प्राचीन नृत्यकला सादर करण्यात आली. सुरुवातीला दिव्यांग सदस्य असणाऱ्या कला मंडळाच्या गणेश वंदनेने उपस्थितांची मने जिंकून घेतली. किरण शांताराम, रमेश सिप्पी आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांना देखील सन्मानित करण्यात आले.


मुख्यमंत्री म्हणाले की, इफ्फी हा कल्पक मनांचा महोत्सव आहे. दरवर्षी आम्ही इफ्फी अभिमानाने आयोजित करतो. मागील काही वर्षांत स्थानिक चित्रपट निर्माते गोव्यात चित्रीकरणाला प्राधान्य देत आहेत. विदेशी चित्रपट निर्मात्यांनी देखील गोव्यात येऊन चित्रीकरण करावे. आम्हाला गोव्याला चित्रपट निर्मितीचे हब बनवायचे आहे. जगभरातील चित्रपट निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी गोव्याला प्राधान्य द्यावे अशी आमची अपेक्षा आहे. जगभरातील कल्पक व्यक्ती, कलाकार, कथा सांगणाऱ्यांचे गोव्यात नेहमीच स्वागत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन म्हणाले की, आम्ही इफ्फीमध्ये दरवर्षी नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतो. यानुसार यंदा इफ्फीचे उद्घाटन खुल्या आवारात करण्यात आले. इफ्फी स्थानिक कलाकारांना, चित्रपट निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देत आहे. यंदाच्या फिल्म बाजारमध्ये १,०५० कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. भारताला कथाकथनाचा प्राचीन इतिहास आहे. इफ्फीच्या माध्यमातून आम्ही याच इतिहासाला तांत्रिकतेची जोड देण्याचा प्रयत्न करत आहोत.
सूत्रसंचालन जय भानुशाली आणि तिस्का चोप्रा यांनी केले.

पुढील १०० जन्म अभिनेता व्हायचेय : रजनीकांत
रजनीकांत यांनी सन्मानाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. ते म्हणाले, हा पुरस्कार चित्रपटात काम करणाऱ्या सर्वांसाठी आहे. मी मागील ५० वर्षे चित्रपटात काम करत असलो, तरी मला ती १० ते १५ वर्षे आहेत असेच वाटते. पुढील जन्म असेल, तर पुढचे १०० जन्म मला अभिनेता म्हणून, रजनीकांत म्हणून जन्म घ्यायचा आहे.

स्थानिक कथा जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न : ऋषभ शेट्टी
अभिनेता ऋषभ शेट्टी म्हणाले की, कर्नाटकात यक्षगान हा एक प्राचीन कला प्रकार आहे. माझ्या अभिनयाची सुरुवात याच कलाप्रकारातून झाली. आमच्या भागात रामायण, महाभारत कथा या कलेच्या माध्यमातून लोकांमध्ये पोहोचल्या. चित्रपटाच्या माध्यमातून स्थानिक कथा जागतिक स्तरावर नेण्याचा माझा प्रयत्न असतो.


भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विजेते
- सर्वोत्कृष्ट चित्रपट : स्किन ऑफ युथ , व्हिएतनाम.
- उत्कृष्ट दिग्दर्शक : संतोष डावखर (गोंधळ).
- उत्कृष्ट अभिनेता : उबेमार रिओस ( ए पोएट).
- उत्कृष्ट अभिनेत्री: यारा सोफिया ऑस्तान (लिटिल ट्रबल गर्ल्स).
- विशेष जुरी : अंकिनोला डेव्हिस ज्युनिअर (माय फादर्स शॅडो ).
- उत्कृष्ट पदार्पण भारतीय दिग्दर्शक : करण सिंग त्यागी (केसरी चॅप्टर २).
- उत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक : हेसम फराहमंद (माय डॉटर्स हेअर) आणि टोनीस पिल (फ्रँक).
- आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक : सेफ हाऊस.
- सर्वोत्कृष्ट वेब सिरीज : बंदिश बँडिट-२.