अतिवेगाने घेतले बळी : अॅक्टिवाचा चालक किरकोळ जखमी

मुळगाव डिचोली येथे झालेल्या अपघातात सापडलेली ड्युक बाईक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : व्हाळशी डिचोली येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील डिझेल मेकॅनिक विभागात शिकणारे रेवोडा (बार्देश) येथील दोघे २० वर्षीय युवक भरधाव वेगाचे बळी ठरले. आयटीआयमधून रेवोडाकडे जात असताना तांबडारस्ता मुळगाव येथे एका अॅक्टिवा स्कूटरला ओव्हरटेक करताना पाठीमागून हलकीशी धडक बसल्याने ड्युक मोटरसायकलवरील दोघेही युवक उसळून पडले व जागीच मृत पावले. या अपघातात अॅक्टिवाचा चालक किरकोळ जखमी झाला. मृत पावलेल्यांची नावे ओमकार फडते व तेजस कवठणकर अशी आहेत.
हा अपघात शुक्रवारी सायं. ५ च्या सुमारास घडला. रेवोडा (बार्देश) येथील ओमकार फडते व तेजस कवठणकर जिवलग मित्र होते. त्यांनी डिचोलीच्या आयटीआयमध्ये गेल्यावर्षी प्रवेश घेतला होता. डिझेल मेकॅनिक विभागात ते प्रशिक्षण घेत होते. या विभागाच्या अंतिम परीक्षेत ओमकार उत्तीर्ण झाला होता, तर तेजसचे काही विषय राहिले होते. सदर परीक्षेसाठी आवश्यक अर्ज भरण्यासाठी ओमकार व तेजस ड्युक बाईकवरून डिचोली आयटीआयमध्ये आले होते. काम संपवून दोघेही ड्युक बाईकवरून रेवोडा येथे जाण्यासाठी निघाले होते. भरधाव वेगाने ओव्हरटेक करून जात असताना तांबडारस्ता मुळगाव येथे रस्त्यावर पुढे चालणाऱ्या अॅक्टिवाला (क्र. जीए ०३ एयू ७९२१) पाठीमागून हलकीशी धडक बसली. त्यामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटला.
या अपघाताची माहिती मिळताच डिचोली पोलीस व १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दोघांनाही डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात आणले. तेथील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

ओमकार फडते व तेजस कवठणकर
एक युवक रस्त्याकडेला, तर दुसरा गटाराच्या पाईपमध्ये
अॅक्टिवाला धडक बसताच बाईकवरील ओमकार व तेजस उसळून बाहेर फेकले गेले. दोघांपैकी एक रस्त्याच्या बाजूला पडला. तेथे दगडाला त्याचे डोके आपटल्याने तो जागीच गतप्राण झाला. या अपघातातील दुसरा युवक रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारच्या खालील पाईपमध्ये अडकला होता. तो प्रथमदर्शनी कोणाच्याही निदर्शनास आला नाही. अपघातानंतर जमलेल्या लोकांचे रस्त्याच्या बाजूला पडलेल्या एका युवकावरच लक्ष गेले. कोणालातरी गटराच्या पाईपमध्ये घुसलेल्या दुसऱ्या युवकाचे पाय दिसले. त्या युवकाला जमलेल्या लोकांनी ओढून बाहेर काढले. त्याची तपासणी केली असता त्याचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.