
म्हापसा : मयडे येथील सार्थक विजय च्यारी (१७) या अल्पवयीन युवकाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. घराबाहेर असताना त्याला विषारी ‘घोणस’ सापाने दंश केला होता. गोमेकॉत उपचार सुरू असताना गुरुवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत सार्थक हा शिवोली येथील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत होता. त्याच्या अशा अकाली जाण्याने मयडे गावात आणि मित्रपरिवारात मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी-आजोबा, बहीण आणि काका असा परिवार आहे.
विशेष नोंद : घोणस (Russell's Viper) हा अत्यंत विषारी साप असून, रात्रीच्या वेळी तो जास्त सक्रिय असतो. नागरिकांनी रात्री बाहेर फिरताना काळजी घ्यावी.