श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ (ज्याला गोकर्ण मठ किंवा पर्तगाळी जीवोत्तम मठ असेही म्हणतात) हा द्रविड वेदांताच्या द्वैत वेदांत परंपरेतील पहिला गौड सारस्वत मठ मानला जातो. ही परंपरा जगद्गुरू श्रीमद् माध्वाचार्य यांनी तेराव्या शतकात सुरू केली. दक्षिण गोव्यातील कुशावती नदीच्या काठी वसलेल्या पर्तगाळी या छोट्या गावात या मठाचे मुख्यालय आहे.

पर्तगाळी मठाची नेमकी स्थापना कोणी आणि कधी केली याबाबत अद्याप संशोधन सुरू आहे. पारंपरिक माहितीप्रमाणे, ही परंपरा उत्तरादी मठातील श्री रघुत्तम तीर्थ (भवबोधारू) यांनी सुरू केली, असे मानले जाते. रघुत्तम तीर्थ (१५३७–१५९६) हे प्रसिद्ध तत्त्वज्ञ, वेदांतवादी, धर्मशास्त्रज्ञ आणि संत होते. त्यांची समाधी (वृंदावन) तमिळनाडूतील तिरुकोइलूर येथे असून येथे मोठ्या प्रमाणावर भक्त येतात. काही विद्वानांच्या मते हा मठ उडुपीच्या पालिमारू मठातून स्वतंत्र झाला, तर काहींच्या मते त्याचा उगम थेट आनंद तीर्थ (मध्वाचार्य) यांच्याकडे जातो.
पीठाधीश्वरांची परंपरा
या मठाचे पहिले पीठाधीश्वर श्री नारायण तीर्थ होते. ते द्वैत परंपरेतील विद्वान होते आणि त्यांना ‘श्रीपाद वडेरु’ ही पदवी प्राप्त झाली. तिसरे स्वामी जीवोत्तम तीर्थ यांच्यानंतर या मठाला ‘जीवोत्तम मठ’ हे नाव रूढ झाले.
१९५०च्या दशकात श्री द्वारकानाथ तीर्थ स्वामींनी अनेक शैक्षणिक संस्था सुरू केल्या आणि प्राचीन ग्रंथांचे पुनर्मुद्रण केले. पोर्तुगीज ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कारवायांमुळे मठ एकदा मडगावहून भटकळ (कर्नाटक) व पुढे कारवार येथे हलवावा लागला.
इतिहास : काशीपासून गोव्यापर्यंतचा प्रवास
प्रचलित परंपरेनुसार, श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाची सुरुवात चैत्र शुद्ध २, शके १३९७ (इ.स. १४७५) रोजी हिमालयातील बद्रिकाश्रम येथे झाली, असे मानले जाते. मध्वाचार्यांनी उडुपीमध्ये द्वैत वेदांताचा प्रचार करण्यासाठी आठ मठांची स्थापना केली. पश्चिम किनारी भागात राहणारा गौड सारस्वत ब्राह्मण समाज याच पालिमारू मठाची आध्यात्मिक परंपरा पाळतो. पालिमार मठाचे आचार्य श्री रामचंद्र तीर्थ हिमालय यात्रेदरम्यान आजारी पडले. उडुपीला संपर्क करणे अशक्य झाल्याने परंपरा तुटण्याचा धोका निर्माण झाला. म्हणून त्यांनी आपल्या सेवेत असलेल्या सारस्वत ब्रह्मचारीला दीक्षा देऊन त्यांना ‘श्री नारायण तीर्थ’ हे नाव दिले आणि आपला उत्तराधिकारी नेमले.
काशीतील चमत्कार आणि मठाची उभारणी
काशीतील पंचगंगा घाटाजवळ स्नान करताना राजकन्येचे सोन्याचे काकण गंगेत पडले. श्री नारायण तीर्थ स्वामी यांच्यावर संशय घेण्यात आला. नंतर काकण नदीच्या पाण्यात सापडले. राजाने स्वामींची क्षमा मागितली. स्वामींनी त्याला सांगितले, आमच्या प्रदेशातील गौड सारस्वत समाजासाठी काशीमध्ये मठ स्थापन करण्याचा विचार आहे; तुमची मदत मिळाली तर मोठे कार्य पूर्ण होईल. राजाने पंचगंगा घाटाशेजारी बिंदुमाधव मंदिराजवळ एक लहान मठ बांधला. येथे श्री लक्ष्मीनारायणाची पंचधातूची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. गौड सारस्वत ब्राह्मणांच्या वैष्णव परंपरेतील हा पहिला मठ मानला जातो.
स्वतंत्र मठपरंपरेची सुरुवात
काशी येथे मठ स्थापून श्री नारायण तीर्थ उडुपीला परत आले. पालिमार मठाचे आचार्य श्री रामचंद्र तीर्थ यांनी आपल्या नवीन शिष्याच्या क्षमतेची जाणीव ठेवून श्री विद्यानिधी तीर्थ यांना आपला उत्तराधिकारी नेमले. श्री नारायण तीर्थ यांना स्वतंत्र मठ परंपरा सुरू करण्याचा आणि सारस्वत समाज संघटित करण्याचा सल्ला दिला.
यानंतर श्री नारायण तीर्थ भटकळ येथे आले आणि येथे मठ उभा करून सारस्वत समाजात श्रद्धा व संस्कृतीचा प्रसार केला.
सारस्वत समुदायाच्या अस्मितेचे केंद्र
अनेक अडचणी, स्थलांतर आणि ऐतिहासिक चढउतार यांना तोंड देत ५५० वर्षांची परंपरा मठाने जपली. २३ स्वामींचे नेतृत्व लाभलेला हा मठ आज सारस्वत अस्मितेचे आणि ऐक्याचे प्रतीक मानला जातो.
देवता व गुरुपद्धती
मुख्य देवता : भगवान श्री वीर विठ्ठल आणि भगवान श्रीराम
गुरुपद्धत : गोकर्ण मठ गुरुपरंपरेनुसार चालतो. प्रत्येक स्वामी शिष्याची लहान वयातच नेमणूक करतो आणि त्यालाच पुढे पीठाधीश्वरपद मिळते.
सध्याचे मठाधीश : श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामी.