डीआयटीईअँडसी, आयटीजीतर्फे काणकोणात डिजिटल सेवांचे जाळे अधिक मजबूत

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठात डिजिटल सुविधांचा शुभारंभ करताना परमपूज्य श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी, मंत्री रोहन खंवटे व इतर.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
काणकोण : काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठात डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभाग (डीआयटीईएण्डसी) आणि इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा (आयटीजी) यांच्या सहयोगाने मोठा उपक्रम राबवण्यात आला आहे. मठाच्या परिसरात १०० हून अधिक वायफाय अॅक्सेस पॉइंट्स आणि २०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, यामुळे संपूर्ण परिसरातील डिजिटल पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात मजबूत झाली आहे. हा उपक्रम गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी औपचारिकरीत्या सुरू करण्यात आला.
समारंभाचे उद्घाटन परमपूज्य श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी, तसेच माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, आयटीजी अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये, डीआयटीईअँडसीचे संचालक कबीर शिरगावकर, आयटीजीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वाळवटकर आणि मध्यवर्ती समिती व सार्ध पंचशतमानोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास शेणवी धेंपो यांच्या उपस्थितीत पार पडला. हा उपक्रम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राबवला गेला असून, गोव्याच्या डिजिटल यंत्रणेला भक्कम करण्याचा सरकारचा उद्देश अधोरेखित करतो.
काणकोण परिसरात आधीपासूनच जीओ आणि बीएसएनएलचे ५जी नेटवर्क उपलब्ध होते. आता एअरटेल (इंडस टावर्स) यांचे नेटवर्कही जोडले गेल्याने मठ परिसरातील मोबाईल नेटवर्क अधिक सुधारले असून, येथे वाढत्या भक्त व पर्यटकांच्या गरजा लक्षात घेऊन हा भाग महत्त्वाचा आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित होत आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आयटीजी कार्यरत आहे. नवीन वायफाय पॉइंट्समुळे १० जीबीपीएसपर्यंत इंटरनेट स्पीड मिळेल, तसेच एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपद्वारे सुलभ लॉग इनची सोय असेल. १०० पेक्षा अधिक वायफाय पॉइंट्सपैकी ५७ कायमस्वरूपी ठेवण्यात आले आहेत. ते उत्सवानंतरही उपलब्ध राहतील. उर्वरित पॉइंट्स मोठी गर्दी लक्षात घेऊन तात्पुरते बसवले आहेत. मठ परिसरात २४० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. काही कॅमेऱ्यांमध्ये एआय क्षमताही आहेत, ज्याद्वारे गर्दीची मोजणी तसेच पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार संशयित व्यक्तींची ओळख पटवणे शक्य होईल. यापैकी ८० कॅमेरे कायमस्वरूपी ठेवण्यात येणार असून, यामुळे सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षितता आणि गर्दी व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल.
या उपक्रमाद्वारे डीआयटीईएण्डसीचे उद्दिष्ट म्हणजे गोव्याच्या प्रत्येक भागात विश्वसनीय डिजिटल सेवा पोहोचवणे आणि ग्रामीण भाग, तसेच आध्यात्मिक केंद्रांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देणे आहे.
सार्ध पंचशतमानोत्सवाच्या भव्य सोहळ्यापूर्वी सर्व डिजिटल सुविधा उपलब्ध केल्याबद्दल मी गोवा सरकार आणि मंत्री रोहन खंवटे यांचे आभार मानतो. ग्रामीण भागात अशी डिजिटल सुविधा मिळणे खूप लाभदायक आहे. मठ व स्थानिक समुदायाच्या दृष्टीने ही मोठी मदत आहे.
_ श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी
...
मठात वायफाय आणि सीसीटीव्हीसारख्या पायाभूत सुविधा उभारल्यामुळे गोव्याची डिजिटल व्यवस्था अधिक सक्षम होत आहे. या सुविधा केवळ सध्याच्या उत्सवासाठीच नव्हे, तर पुढील अनेक वर्षे स्थानिक समुदाय आणि पर्यटकांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. यामुळे गोवा आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र म्हणून अधिक मजबूत होईल.
_ रोहन खंवटे, माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री