पंतप्रधानांचे उद्गार : विद्याधीश तीर्थ स्वामी यांच्या उपस्थितीत भव्य श्रीराम पुतळ्याचे अनावरण

प्रभू श्रीरामाच्या ७७ फुटी कांस्य पुतळ्याचे कळ दाबून अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी आणि श्रीनिवास धेंपो. (संजय कोमरपंत)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
काणकोण : पर्तगाळी येथील जीवोत्तम मठ ज्ञान, प्रेरणा आणि साधना यांची दिशा देणारे केंद्र आहे. हा मठ उर्जेचा स्रोत आहे. या मठाने आध्यात्मिक परंपरा जिवंत ठेवली आहे. माणसांना जोडण्याचे काम मठाने निरंतर केले आहे. सत्याच्या मार्गाने जाणारे डगमगत नाहीत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी काढले.
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाला ५५० वर्षे पूर्ण होत असल्याने सार्ध पंचशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत शुक्रवारी मठाने उभारलेल्या ७७ फूट उंच कांस्य धातूच्या प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित भव्य सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. व्यासपीठावर विद्याधीश तीर्थ स्वामी, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, काणकोणचे आमदार तथा क्रीडामंत्री रमेश तवडकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, उपाध्यक्ष आर. आर. कामत आदी उपस्थित होते. पंतप्रधान व मान्यवरांच्या हस्ते ५५० रुपयांच्या नाण्याचे, टपाल तिकिटाचे व रामायण थीम पार्कचे उद्घाटन करण्यात आले. मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्व नेता असून त्यांचा ‘सबका साथ सबका विकास’ हा नारा सर्वत्र घुमत आहे.
कार्यक्रमात विद्याधीश तीर्थ स्वामी यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. टपाल तिकिटाचे अनावरण करताना पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह उपस्थित होते. गुरुवारपासून सार्ध पंचशताब्दी महोत्सवाला सुरुवात झाली. शुक्रवारी भव्य कार्यक्रमाला गोव्यासह कर्नाटक, महाराष्ट्र व इतर राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मठ समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. गोवा पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने १ हजार पोलीस तैनात केले होते.
५५० रुपयांचे नाणे बनले हैदराबाद टांकसाळीत
पर्तगाळ मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने जारी केलेले ५५० रुपयांचे नाणे हे हैदराबाद टांकसाळीत बनवण्यात आले आहे. या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम आहे. ते ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के जस्त आणि ५ टक्के निकेल या धातूंपासून बनवले आहे. या नाण्याच्या एका बाजुला महोत्सवाचे बोधचिन्ह व पर्तगाळी जीवोत्तम मठाचे नाव आहे.
पंतप्रधानांकडून भाषणाची सुरुवात कोकणीतून
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात, ‘सगळ्या भक्तांंक आनी अनुयायांंक मायेमोगाचो नमस्कार’ या कोकणी वाक्याने केली. पंतप्रधान पुढे म्हणाले, आजचा दिवस आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंद देणारा दिवस आहे. आज मला साधू-संतांच्या सान्निध्यात बसण्याचे भाग्य प्राप्त झाले. श्रीराम व वीर विठ्ठल देवाचे दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले. कित्येक युगे बदलली, कित्येक परिवर्तने झाली, मात्र गोकर्ण जीवोत्तम मठाने आपली दिशा बदलली नाही. ७७ फूट उंचीच्या श्रीराम पुतळ्याचे अनावरण झाल्याने या मठाला नवा आयाम प्राप्त झाला आहे.

मठ, मंदिरांमुळे गोमंतकीय संस्कृतीचे रक्षण : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्यावर भोज, कदंब, चालुक्य, राष्ट्रकुट, बहामनी, विजयनगर, विजापूरची आदिलशाही आणि पोर्तुगीज राजवटी आल्या. काही जणांनी आपली संस्कृती गोव्यावर लादण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील मठ, मंदिरांमुळे गोमंतकीय संस्कृतीचे रक्षण झाले. मठांनी आणि मंदिरांनीच संस्कृती टिकवून ठेवली. यात पर्तगाळी जीवोत्तम मठाचेही मोठे योगदान आहे. पर्तगाळ ही दक्षिणेची अयोध्या आहे. या महोत्सवाला पंतप्रधान मोदींनी उपस्थित राहणे, हे गोमंतकीयांचे भाग्य आहे. पंतप्रधान मोदींच्या सहकार्याने नवे सेतू तयार झाले असून गोव्याचा विकास वेगाने होत आहे. पर्तगाळ मठ हे भविष्यात महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनेल.

पंतप्रधान मोदी ‘धर्मपुत्र’ !
आपल्या आशीर्वचन पर भाषणात श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी म्हणाले की, मठाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चातुर्मास व्रत करतात, नवरात्रीत उपवास करतात. त्यांनी एकादशीचे व्रतही करावे. त्यांनी अयोध्येत रामलल्लाच्या मंदिराची उभारणी केली. आज दक्षिण अयोध्येत म्हणजेच पर्तगाळी मठाच्या प्रांगणात श्रीराम पुतळ्याचे अनावरण केले. त्यांचे कार्य श्रीकृष्णासारखे आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने ‘धर्मपुत्र’ आहेत. त्यांचे २०४७ पर्यंतचे व्हिजन पूर्ण होईल. त्यांना घडविण्यात त्यांच्या आई हिराबेन यांचे खूप मोठे योगदान आहे.