
वास्को : गोव्यातील (Goa) बायणा, वास्को (Vasco) येथे सागर नायक (Sagar Nayak) या व्यावसायिकाच्या फ्लॅटवर (Flat) गेल्या काही दिवसांमागे पडलेल्या सशस्त्र दरोड्यानंतर (Armed Dacoity) येथील कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न ऐरणीवर आला. पोलिसांच्या (Goa Police) तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची (CCTV Camera) दयनीय स्थितीही उजेडात आली.
गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळ वास्कोतील सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणाच बंद आहे. त्याचा फायदा घेत येथे याठिकाणी गुन्हेगारी वाढत असल्याचे पोलीस अधिकारी व स्थानिकांचे म्हणणे आहे.
५२ सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी
२०१३ मध्ये खासदार निधीतून बसवण्यात आलेले ५२ सीसीटीव्ही कॅमेरे देखभाली अभावी कुचकामी ठरले आहेत. वास्को शहरातील मोक्याच्या जंक्शनवर विजेच्या खांबांवर बसवलेले हे कॅमेरे शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. या कॅमेऱ्यांत काहीच टिपले जात नाही. त्यामुळे त्यांचा काहीच फायदा नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गुन्ह्यांच्या तपासासाठी कॅमेरे सहाय्यभूत
वास्कोसारख्या बंदर असलेल्या शहरात मजबूत सीसीटीव्ही यंत्रणा असणे महत्त्वाचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घडणारे गुन्हे, अपघात, घर, दुकान फोड्या, दरोडे यांसारख्या गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा दुवा बनत असते.
त्याचबरोबर सुरळीत वाहतुकीसाठीही हे कॅमेरे जागल्याची भूमिका बजावत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असताना ‘हिट अॅंड रन’सारखे तसेच इतर काही गुन्ह्यांचा तपास लावण्यास कॅमेऱ्यांची फूटेज सहाय्यभूत ठरली होती.
कॅमेऱ्यांत चित्रण टिपले गेल्याने गुन्हेगार, नियमांचे उल्लंघन करून वाहने हाकणारे, यांची ओळख पटवणे शक्य होते. त्यानंतर पुढील कारवाई करणे सोपे जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
कॅमेऱ्यांमुळे वाहतुकीवर देखरेख
कॅमेरे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असलेल्या वाहन चालकांवर देखरेख ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सीसीटीव्हीमुळे घरपोच दंड पोचणार या भीतीने वाहन चालक व्यवस्थित वाहने चालवतात व त्यामुळे अपघातांवरही नियंत्रण राहत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी अनेक वेळा सांगूनही नगरपालिका, प्रशासन यांनी याकडे लक्ष दिले नसल्याचे या सूत्रांनी सांगितले. सध्या, पोलीस तपासासाठी खाजगी आस्थापनांच्या सीसीटीव्हीचा वापर करतात. मात्र, त्यात मर्यादा असून, वास्को शहरात सक्षम सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वयीत करणे हाच त्यावर प्रभावी तोडगा असल्याचे या सूत्रांनी सांगितले.