'पीडीए कॉलनीतील फ्लॅट'चा दावा चुकीचा ठरला. १७ कोटींच्या कथित व्यवहाराचा तपास सुरूच

पणजी: गोव्यातील बहुचर्चित सरकारी नोकरभरती घोटाळ्यातील मुख्य संशयित पूजा नाईक हिने थेट सरकारी अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांची सत्यता पडताळणी करताना, तिचे अनेक दावे चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचे सिद्ध झाले आहे. उत्तर गोवा पोलीस (गुन्हा शाखा) अधीक्षक राहुल गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. रायबंदर येथील गुन्हा शाखेच्या कार्यालयात पत्रकारांना ते संबोधित करत होते.
काय आहे नेमके प्रकरण?
पूजा नाईक ( नोव्हेंबर २०२४ मध्ये जामिनावर बाहेर आहे असून तिच्यावर गोव्यात पाच गुन्हे दाखल आहेत) हिचा एक व्हिडिओ ९ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तिने २०१९ ते २०२२ या काळात सरकारी नोकऱ्या मिळवून देण्यासाठी दोन सरकारी अधिकाऱ्यांना १७.६८ कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांनंतर, गुन्हा शाखेने (Crime Branch) दोन सरकारी अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांविषयी भारतीय न्याय संहिता (BNSS) कलम १७३(३) अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

दाव्यांची पडताळणी
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले की, पूजा नाईक हिचे आरोप गंभीर असल्यामुळे गुन्हा शाखेने तिचे दोन वेळा सविस्तर जबाब नोंदवले आहेत. नुकतीच तिची पाच तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान, पोलिसांनी पूजा नाईकने केलेल्या प्रत्येक दाव्याची सत्यता पडताळणी करण्यास सुरुवात केली. यात अनेक महत्त्वाचे दावे चुकीचे असल्याचे आढळले.

गुन्हा शाखेचा तपास सुरूच
अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पत्रकारांना सांगितले की, पूजा नाईकने आतापर्यंत केलेल्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहिली असता, अनेक दावे चुकीचे असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही, आरोप गंभीर असल्याने तपास सुरूच राहील. गुन्हा शाखा सध्या नोंदवलेल्या जबाबांचे विश्लेषण करत असून, या प्रकरणात भविष्यातील पुढील कारवाई काय करायची, याचा निर्णय घेणार आहे. या घोटाळ्यातील शेकडो पीडितांकडून नोकरीचे आश्वासन देऊन मोठी रक्कम उकळल्याच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे.