
नवी दिल्ली: दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आलेले 'फरीदाबाद टेरर मॉड्यूल' आणि 'अल-फलाह विद्यापीठ' यांच्या कनेक्शनने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या मॉड्यूलचा मास्टरमाइंड, शोपियां (जम्मू-काश्मीर) येथील इमाम इरफान अहमद याला अटक करण्यात आली असून, तो फरीदाबादमध्ये डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या डोक्यात दहशतवादाचे विष भरत होता, अशी धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे.

इमाम इरफान अहमद हा पूर्वी श्रीनगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये पॅरामेडिकल स्टाफ म्हणून कार्यरत होता. त्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधून फरीदाबादच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका नव्या दहशतवादी मॉड्यूलचा पाया रचला, ज्यात अनेक डॉक्टरांचाही सहभाग होता. सूत्रांनुसार, तो सातत्याने या विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना कट्टरपंथी बनवत होता.

इरफान अहमद हा मॉड्यूलचा सूत्रधार होता, तर त्याचे सहकारी डॉक्टर मुजम्मिल शकील आणि डॉक्टर मोहम्मद उमर हे मिशनला प्रत्यक्षात उतरवण्यात सक्रिय होते. याच उमरने गडबडीत लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडवल्याचे उघड झाले आहे. इरफान अहमदचे अफगाणिस्तानमधील काही लोकांशी व्हीओआयपी (VoIP) च्या माध्यमातून संपर्क होता.

अल-फलाह विद्यापीठावर धडक छापेमारी
दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी डॉ. मोहम्मद उमर नबी याची सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर, पोलीस पथक तातडीने हरियाणातील फरीदाबाद येथील 'अल-फलाह' विद्यापीठात पोहोचले. उमर हा याच विद्यापीठात फॅकल्टी होता.

पोलिसांनी केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या आठ लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. एनआयए (NIA) पथकही येथे पोहोचले होते आणि सध्या विद्यापीठाच्या संपूर्ण परिसराला छावणीचे रूप आले आहे.
ट्रस्टच्या पैशातून फंडिंगचा संशय
अल-फलाह विद्यापीठ हे अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवले जाते आणि ट्रस्टच्या पैशातून या मॉड्यूलला फंडिंग होत असल्याचा तपास यंत्रणांचा प्राथमिक संशय आहे. या विद्यापीठाला यूजीसीची मान्यता असून, त्याला 'नॅक' (NAAC) कडून 'ए' ग्रेड मिळाला आहे. ७० एकरच्या शांत आणि हिरवळीने नटलेल्या कॅम्पसमध्ये हे विद्यापीठ विविध अभ्यासक्रम चालवते. 'अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर' अंतर्गत ६५० खाटांचे मोठे हॉस्पिटल देखील चालवले जाते.

महिला फायनान्सरही अटकेत
या मॉड्यूलची फायनान्सर म्हणून उत्तर प्रदेशातील डॉ. शाहीन सईद हिचे नाव पुढे आले आहे. ती याच अल-फलाह विद्यापीठात शिकवत होती. शाहीन ही जैश-ए-मोहम्मदच्या (JeM) महिला विंगची भारतीय कमांडर असल्याचे सांगितले जाते.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत या मॉड्यूलशी संबंधित सात संशयितांना अटक केली आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

दिल्ली बॉम्बस्फोट आणि आता पर्यंतच्या तपासकार्याची संक्षिप्त माहिती