म्हापशात सशस्त्र दरोडा

कुटुंबाला बांधून ५० लाखांची लूट; तपास पथके कर्नाटक, महाराष्ट्रात रवाना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th October, 05:59 pm
म्हापशात सशस्त्र दरोडा

म्हापसा : येथील गणेशपुरी परिसरात डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर मंगळवारी पहाटे सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकून ५० लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लुटला. दरोडेखोरांनी घाणेकर कुटुंबातील सदस्यांना मारहाण करत, त्यांना बांधून घरात दहशत निर्माण केली. या गंभीर घटनेची नोंद घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस महासंचालकांसह तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

वृद्ध आईसह कुटुंबाला बांधून ५० लाखांची लूट

ही थरारक घटना मंगळवारी पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान घडली. डॉ. घाणेकर यांचे कुटुंब गाढ झोपेत असताना, सात दरोडेखोर खिडकीचे लोखंडी ग्रील कापून बंगल्यात घुसले. दरोड्याच्या वेळी डॉ. घाणेकर यांची ८० वर्षीय वृद्ध आई स्वयंपाक खोलीत चहा करत असताना, चाहूल लागण्यापूर्वीच दरोडेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. त्यांना सुरीचा धाक दाखवत तिथेच बांधून ठेवले. नंतर पहिल्या मजल्यावर झोपलेल्या डॉ. महेंद्र, त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा आणि १४ वर्षीय मुलीला उठवून सुरीचा धाक दाखवला. त्यांचे सर्व मोबाईल फोन काढून घेतले. दरोडेखोरांनी डॉ. अनुराधा यांना खोलीतील बाथरूममध्ये बंद केले, तर डॉ. महेंद्र यांना मारहाण करून बांधून घातले. मुलीला तिच्या खोलीत बंद करण्यापूर्वी धमकावून कपाटाच्या चाव्या घेतल्या. दरोडेखोरांनी घरातील दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५० लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेमुळे काही महिन्यांपूर्वी दोनापावला येथे उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर झालेल्या सशस्त्र दरोड्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्या प्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत, त्यामुळे या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पोलीस महासंचालक आलोक कुमार, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक तुषार वेर्णेकर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, या दरोड्यात परराज्यातील टोळीचा हात असल्याचा संशय आहे. त्यानुसार तपासासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र मध्ये पोलीस पथके पाठवण्यात आली आहेत. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. तसेच, रात्रीची गस्त वाढवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.


पळवलेली कार मेरशी येथे सापडली

दरोडेखोरांनी जाताना चोरून नेलेली डॉ. घाणेकर यांची कार मेरशी जंक्शनजवळ सोडून दिल्याचे आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला असून, फॉरेन्सिक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निखील पालेकर करत आहेत.

सुऱ्या हातात होत्या, मात्र जीवाला धोका नाही हेच समाधान!

दरोड्याच्या थरारानंतर डॉक्टर महिलेची प्रतिक्रिया
पणजी : म्हापसा येथील गणेशपुरी परिसरात डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर पडलेल्या सशस्त्र दरोड्यानंतर कुटुंबातील डॉ. नूतन देव या महिलेने घटनेचा थरार सांगितला. हातात सुरे घेऊन दरोडेखोर बंगल्यात शिरले, दहशत माजवली आणि कुटुंबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मात्र, या एकूण घटनेत कुणालाच गंभीर इजा झाली नाही, हेच मोठे समाधान असल्याचे या महिलेने सांगितले.
विरोध करताच मारहाण
डॉ. नूतन यांनी दिलेल्या माहितीनुसार, खिडकीचे ग्रील्स तोडून एक दरोडेखोर प्रथम बंगल्यात शिरला आणि त्याने मुख्य दरवाजा उघडून इतरांना आत घेतले. दरोडेखोरांनी उत्तर भारतीय हिंदीत संवाद साधत घरात दहशत निर्माण केली. ते सर्वजण ३५ ते ४० वयोगटातील असावेत.
डॉ. महेंद्र घाणेकर व त्यांच्या कुटुंबाने विरोध करण्याचा प्रयत्न करताच, दरोडेखोरांनी त्यांना बांधून ठेवले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातात सुऱ्या होत्या, पण त्याचा वापर त्यांनी केला नाही. दरोडेखोरांनी प्रथम दागिने शोधले. सोन्याचे दागिने लॉकरमध्ये असल्याने जास्त काही मिळाले नाही, मात्र सोन्याच्या बांगड्या व इतर दागिने घेऊन त्यांनी रोख रकमेसाठी मारहाण सुरू केली.
आजीने स्वतःहून दिले १० लाख
- रोख रकमेसाठी मारहाण सुरू झाल्यावर बंगल्यातील वृद्धेने आपल्या जवळ असलेले सुमारे १० लाख रुपये या दरोडेखोरांच्या स्वाधीन केले. त्यानंतरच दरोडेखोर बंगल्याबाहेर पडले.
- सोन्याचे दागिने आणि वृद्धेकडील रोख रक्कम मिळून सुमारे ३५ लाख रुपयांचा ऐवज पळविला असावा, असा अंदाज डॉ. नूतन यांनी व्यक्त केला.
- जाताना दरोडेखोरांनी कुटुंबाचे चार मोबाईल फोन आणि बंगल्याबाहेर असलेली कारही चोरून नेली.

हेही वाचा