सगळे विषयभोग हे देहसुखासाठीच असतात. आणि देह हा तर काळाचे भक्ष्य आहे. नर-देह-रूप हा शेवटचा बाजार मानला जातो. त्यात दु:खरूप माल भरलेला असून तिथे 'मरणा'चे माप चालते.

किंपुनर्ब्राह्मणा: पुण्या भक्ता राजर्षयस्तथा।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य मजस्वमाम्।।३३।।
सरळ अर्थ : तर मग हे काय सांगावयास पाहिजे, की पुण्यशील ब्राह्मणजन व राजर्षी भक्तलोक परमगतीला पोचतात. म्हणून सुखरहित व क्षणभंगुर अशा या मनुष्य शरीराला प्राप्त झाल्यामुळे निरंतर माझेच भजन कर.
अर्थात् मनुष्य शरीर फार दुर्लभ आहे. परंतु ते तर नाशवंत व सुखरहित आहे. यासाठी कालाचा भरंवसा न धरता आणि अज्ञानाने सुखरूप भासणाऱ्या विषयांच्या भोगात न फसता निरंतर माझेच भजन कर.
विस्तृत विवेचन : मागील लेखात आपण- "श्रीकृष्ण म्हणतात की कोणत्याही मिषाने का होईना, पण वृत्ती माझ्या ठायी जडू दे. मग तो वा ती कोणीही असो. नि:संदेह मद्रूपच होणार.- इथपर्यंत आलो होतो. आता या ३३व्या श्लोकात भगवान विवेचनाचे आणखीही पुढील बारकावे देत आहेत.
जे सत्शील ब्राह्मण कर्माने सदाचारी आहेत, आणि त्यायोगे ज्यांचा सदासर्वदा स्वर्गांतच निवास असतो, जे मंत्रविद्येसाठी प्रत्यक्ष माहेरच असल्यासारखे आहेत, ज्यांना "पृथ्वीवरील देव" असे सुद्धा म्हणण्यात येते, ज्यांच्या तीर्थांचा भाग्योदय होतो, जे यज्ञांचे आश्रयस्थान आहेत, ज्यांचे अभेद्य कवच लेवून वेद सुद्धा सुरक्षित राहिलेत, ज्यांच्या दृष्टी-रूप मांडीवर मांगल्य/पवित्रता खऱ्या अर्थाने वृद्धिंगत होते, ज्यांच्या आस्थेची ओल लाभली असता सत्कर्मांचा वेल विस्तारतो, ज्यांच्या संकल्पाला अनुसरून सत्याला जीवन लाभले आहे, ज्यांच्या शुभाशीर्वादाने अग्नीचेही आयुष्य वाढले असे म्हणतात (श्वेतकीराजा हा सतत यज्ञ करीत असल्यामुळे घृतादी आहुतिभक्षणाने अग्नीला जाड्य प्राप्त होऊन त्याचे तेज कमी झाले असता अशा ब्राह्मणांच्या व ऋत्विजांच्या आशीर्वादाने पांडवांच्या संरक्षणाखाली अनेक औषधी वनस्पतींनी युक्त असे खांडववन भक्षण करून तो अग्नी पुन्हा सतेज झाला; आणि म्हणून त्या सदाचारी ऋत्विजांना संतुष्ट करण्यासाठीच समुद्र आपल्या पोटात राहणाऱ्या वडवाग्नीला पाण्याचे शोषण करू देत असतो!) ब्राह्मणाच्या पायाची खूण प्रत्यक्ष विष्णू सुद्धा स्वतः आपल्या वक्षस्थळी मिरवतो!
भृगू हा ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक ब्रह्मर्षी. ब्रह्मदेव, शंकर व विष्णू या तिघांत श्रेष्ठ कोण, याबद्दल एकदा ऋषींमध्ये वाद होऊन भृगूला परीक्षा करण्यास पाठवावे असे ठरले. ब्रह्मदेव व शंकर यांच्याकडे जाऊन त्याने अपमानजनक वर्तन केले तेव्हा त्या दोघांनाही क्रोध आला. नंतर तो विष्णूकडे गेला. विष्णू झोपला असल्यामुळे त्यास उठविण्यासाठी भृगूने त्याच्या वक्षःस्थलावर पदाघात केला. भगवान विष्णूला मुळीच राग आला नाही. उलट रमादेवीला दूर सारून व गळ्यातील कौस्तुभालंकार काढून त्याने भृगू ऋषींचा पाय आपल्या वक्षःस्थलाशी धरून तो आदराने चुरत राहिला. तेव्हापासून आपल्या छातीवरील भृगूंच्या पदाघाताची ती खूण विष्णू श्रीवत्सलांच्छन म्हणून मिरवायला लागला. तेव्हा विष्णूच श्रेष्ठ असा त्याने म्हणजे भृगूने निर्णय दिला.
काळाग्निरुद्रासारखे प्रखर कोपिष्ट असे जरी हे लोक असले तरी त्यांचा आशीर्वाद लाभला तर अनायासे सिद्धी हाती येतात! असे जे थोर आणि पुण्यवंत असतात ते जर माझ्या ठायी तत्पर झाले, तर ते मद्रूपच होतील यात काही संशय आहे का?
चंदनाच्या सानिध्यात राहून राहून कडुनिंबाला सुद्धा सुवास येतो असे म्हणतात. जिथे ते सुद्धा उगाळून देवांच्या कपाळी लावले जाते, तिथे चंदन असेल तर ते लावले जातेच जाते, हे ओघाने आलेच!
रस्त्यावरील पाणी ओहोळाने वहाळात जाऊन त्या वहाळाबरोबर गंगेला जाऊन मिळते व मग गंगेबरोबर समुद्राला मिळते. याचा अर्थ गंगासुद्धा समुद्राला जाऊन मिळतेच मिळते, असाच होतो! त्या व्यतिरिक्त गंगेला आणखी कोणती दुसरी गती आहे का?
म्हणून काया-वाचा-मने माझे भक्त असलेले सदाचारी असे राजर्षी आणि ब्राह्मण यांना "एकच एक मी" हेच आश्रयस्थान आहे. त्यांना माझे परं-धाम लाभतेच लाभते. म्हणून ते सर्वार्थाने मूर्त परब्रह्मच होत.
शेकडो छिद्रे असलेल्या नावेत बसायचे झाले तर जीव-रक्षणाचा परिपूर्ण विचार आधी करावा लागतोच ना! तिकडे दुर्लक्ष करून चालते का? जिथे क्षणोक्षणी अंगावर शस्त्रांचा वा दगडांचा वर्षाव होत असतो, तिथे अंगावर कवच वा चिलखत न चढवता वा ढाल पुढे न करता जाऊन चालते का?
देहाला रोगाने व्यापले की औषध घेणे हाच त्यावर उपाय असतो. आजूबाजूस सगळीकडे आग पेटली असता तिथून दूर निघून जाणे हाच उपाय असतो. तसे दु:खरूप संसारात जन्मल्यावर त्या दु:खांचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी माझी भक्ती करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. कारण त्याशिवाय संसार दु:खांपासून निश्चिंतता येत नाही.
अर्जुना, हे लक्षात घे की सगळे विषयभोग हे देहसुखासाठीच असतात. आणि देह हा तर काळाचे भक्ष्य आहे. नर-देह-रूप हा शेवटचा बाजार मानला जातो. त्यात दु:खरूप माल भरलेला असून तिथे 'मरणा'चे माप चालते. राखुंडी फुंकल्यावर दिवा विझतो, पेटत नाही. एखादा विष-कंद जरी चवीला रुचकर लागला तरी त्याचा रस काढून त्याला अमृत म्हणता येत नाही. विस्तवाच्या अंथरुणावर सुख-निद्रा लागू शकत नाही.
या जगात सूर्यचंद्राचा उदय हा अस्तासाठीच होतो. सुखाचा बुरखा घेऊन दु:ख हे प्राण्यांना (जीवांना) छळते. आनंदाची सकाळ होते न होते तोच दु:खाचा अंधकार नजरेसमोर यायला लागतो. पोटात गर्भ असतो. त्याचा जन्म अजून व्हायचाच असतो. पण काही बाबतीत त्याचा जन्म व्हायच्या आधीच तिथे पोटातच त्या गर्भाला मृत्यू कवटाळतो!
(क्रमशः)

मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल
असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३