श्रावण महिना आणि झुला... झोपाळा यांचे नाते हळुवार... सुखद तेवढेच आल्हाददायक. झुला हसवतो, खुलवतो, खुळावतो, फुलवतो, जोजवतो, झुलवतो.

रिमझिम रिमझिम मेघ बरसे
पनघर उपर लगी रे झडी सखी
पहला महिना सावन का लगिया
सावन मे तिज लगाये सखी
जो घर होते श्याम हमारे
हम भी झुले डलावे रे सखी। हम...
लोकपरंपरेत तर झुला हा सर्वसामान्य लोकमानसाच्या विरंगुळ्याचे आणि मनोरंजनाचे साधन होता. घराच्या ओसरीवर छताच्या लाकडी पाटीला दोन दोऱ्या ( जाडसर ) बांधून त्यात मधोमध लाकडी पाट म्हणजेच बसायची ‘म्हनी’ ठेवली की मग लहान मुलांची चंगळ असायची. खास करून मुली आपल्या छोट्या भावंडांना मांडीवर बसवून झोके घ्यायच्या त्यावेळी गीते म्हणायच्या. या गीतांना ‘आट्यावरची गीते’ म्हटले जायचे.
ह्या आट्यापोंनसून त्या आट्यापोंनसून
कोळशे लोटयाले कोळशे लोटयाले
खयच्यान रे मामा येशी ...?
चाफ्या पोनसून....चाफ्या पोनसून
चाफ्याची चाफी काढून
तुऱ्याक मरे लायशीत ...तुऱ्याक मरे लायशीत
माझो तुरो तुझो तुरो दैवाचो... दैवाचो
गोठो भरलो गाय म्हशीचो...गाय म्हशीचो..
आनंदाच्या प्रसंगी आपण झुलतो, खुलतो. बालपण वडाच्या पारंब्यांचे झोके घेत घेत सरले. कधी कोठे एखादी वेल दिसली तर तिनेही बऱ्याच जणांच्या बालपणाला झुलविलेले आहे. चौसोपी राजंगणाच्या घराच्या पडवीत तर कलाकुसर केलेला झुला त्या घराची अभिजात कलात्मकता अधोरेखित करायचा. झुलणे हे तर मानवी जगण्यातील काव्यच होते. आजही बागेत, घरात झुला हवाच असे मनःपूर्वक वाटते. मानवी मनाची ठेवणंच मुळी अशी आहे की ज्याची त्यांना अनिवार ओढ असते. जे त्यांना स्वतःला आवडते तिच आंतरिक ओढ ते आपल्या लोकदैवतांना लोकसंचितांनाही जुळवितात. लोकमनाची धार्मिक संस्कृती, त्यांची आध्यात्मिक मनोवृत्ती अधोरेखित होते. झुल्याचेही तसेच आहे. झुल्यावर बसायला स्वतःला आवडते मग त्यांच्या आवडत्या लोकदैवतांना सुद्धा त्यांनी झुल्यावर बसवून झुलविण्याची परंपरा सुरू केली असावी. विविध सण उत्सवांच्या निमित्ताने म्हणा देवांना झुल्यावर बसवणे, त्यांच्यासाठी खास आकर्षक पद्धतीने ते सजवणे त्यांच्यातील उत्सवमूर्तींना अलंकारांनी सुशोभित करणे ही मानवी मनाची ओढ इथे या झुलोत्सवात दिसते. श्रावण आणि झुला असे हे समीकरण...परंतु गोव्यात मात्र नवरात्रोत्सवाच्या नऊही रात्री झुल्याचे झुलणे मंदिरातून होत असते. खासकरून देवभूमी अंतरुज महालात तर साक्षात स्वर्गलोकातून देवदेवता या भूतलावर अवतीर्ण झाल्याचा भाव जागृत होतो. मुळात आपली भूमी उत्सवप्रिय. प्रेम आणि भक्ती यांचे अद्वैत या इथे झुल्याच्या झुलण्यात आहे. झुल्यामुळे नवरात्रीच्या प्रत्येक रात्रीला वेगळेच तेज चढते. दरवर्षी हा उत्सव प्रत्यक्षदर्शी पाहण्याची अनिवार ओढ मनाला लागलेली असते. आता ही ती ओढ तशीच आहे. माशेलच्या देवकी कृष्णाला झुल्यात बसवून झुलवितानाची माय लेकाची उत्सवमूर्ती डोळे भरून पाहताना येणारी वात्सल्याची अनुभूती आईच्या अत्युच्च्य प्रेमाची उत्कटता अधोरेखित करते. मात्र या वेळी सुरुवातीला जायचे होते ते फोंडा मडकई येथील नवदुर्गेच्या मंदिरात...! विजेच्या रोषणाईने उत्साहित झालेला परिसर, भक्तगणांची वर्दळ, घंटानाद, झुला झुलविण्यासाठी अजून बराच अवकाश होता. मात्र यावेळी झुला झुलविताना तर पहायचे होतेच शिवाय तो झुलविण्यापूर्वी त्याची फुलांच्या माळांनी आकर्षक सजावट कशी करतात हे पहायचे होते. झेंडू, जाई, शेवंती, कण्हेर सारख्या फुलांनी मखर सजविण्यासाठी कलात्मक हात आणि उत्साही मने जुळली होती. अजून बराच अवकाश होता. तरीही मंदिरात गर्दी जमली होती. लोक आपापली जागा अडवून बसू लागले. कीर्तनासाठी आणि त्यानंतर होणाऱ्या झुलोत्सवासाठी ही गर्दी होती. दिव्यांची रोषणाई, सभागृहातील काष्ठशिल्पे, छतावरील लाकडी चित्रे मंदिराची अभिजातता अधिक वृद्धिंगत करीत होती.
या इथे मडकईच्या नवदुर्गेला नऊही रात्री विविध वाहनांवर बसवून अलंकृत केले जाते. घोडा, नंदी, वाघ, मारुती, हत्ती, मोर, गरुड, सिंह, गंड भैरव हा दोन तोंडाचा पक्षी शेवटच्या रात्री ती महिषासुरमर्दिनी असुरांचे निर्दालन करणारी ती... शांत, सौम्य, शीतल अशा रुपात तर तीच उग्ररूप धारण करणारी शक्तीमाता अशी तिची रूपे भाविक मनाला दिलासा देतात. श्रद्धेने तिच्या चरणी लीन होण्यासाठी कुठून कुठून श्रद्धाळू जन येतात. भजन, कीर्तन, आरत्यात दंग राहतात. देवीला झुल्यात बसवून ते तिला झुलवितानाच्या प्रत्येक क्षणाचे साक्षीदार बनतात आणि समाधानाने माघारी परततात. तिचा झुला भव्यदिव्य... शेकडो वर्षांपूर्वीचा... मजबूत टिकाऊ लाकूड. दरवर्षी नवरात्रीपूर्वी दहा-पंधरा दिवस अगोदर झुला रंगविला जातो. प्रत्येक रात्री तो फुलांनी सजविला जातो. गंड भैरवावर विराजमान झालेली देवी. अलंकारांनी सुशोभित केलेली होती. उजव्या हातात खड्ग तर डाव्या हातात ढाल ... ती करारी बाण्याची... काठपदरी हिरवीकंच साडी नेसलेली,
कपाळावर गंध, त्यावर मोठा टिळा...लक्षवेधून घेणारी आणि तिच्या अभिजात खानदानी सौंदर्यात भर घालणारी नथ ही उत्सवप्रिय मूर्ती जणू जिवंत करते असेच भासते.
शेवटची रात्र ही जागराची... उत्साहाची. भजन, कीर्तन, पालखी आणि नंतर झुला उत्सव... पहाट प्रहरी सूर्य किरणांना डोळ्यात साठवूनच उत्सवमूर्तीला तिच्या जागी ठेवले जाते. ढोल, तासे, कासाळे आणि अखंडपणे केलेला घंटानाद या वाद्यांच्या तालावर देवीला आरती ओवाळली जाते. अलीकडे गंगेची नर्मदेच्या घाटावर खास नदीची केलेली आरती बघितली होती. तिन्हीसांजेला नदीकाठी... घाटावर साग्रसंगीत आरतीची तयारी करून ठेवलेली असते. सूर्य अस्ताला जाताना आणि तो उगवताना नदीची ओवाळणी करताना हातात जड अशी आरती घेऊन लोकवाद्यांच्या साथीने ती अशा काही लकबीने ओवळली जाते की ती कलात्मक, लवचिकता अनुभवताना नतमस्तक व्हायला होते. मनगटाची तीच लकब... तीच लय... तोच ताल आणि तीच स्थिरता मला इथेही जाणवली. अखंडितपणे पाऊण ते एक तासापर्यंत घंटानाद... वाद्यसंगीत आणि तेवढ्याच तन्मयतेने देवीला झुलविताना त्या मूर्तीसाठी आरती ओवाळतानाची मनगटातील ती लवचिकता, स्थिर पावले, डोळे एकटक मूर्तीकडे लागलेले आणि हातात चैतन्यदायी वातीची आरती...! स्वर्गीय आनंदाची अनुभूती ती हीच असेल का..? संथ लयीतून... सुरू झालेले झोके... पुढे वेग घेतात... वाद्यसंगीत चालूच असते... त्यात घंटानाद समरस होतो. झुला गतीने सरकत असतो. त्याला झुलविणारे हातही तेवढेच कणखर याच हातांनी तिला सुकोमल सजवलेले असते तेच हात तिला झुलवितात, ओवाळतात, प्रसाद वाटतात आणि भक्तिभावाने जोडलेही जातात. झुला झुलताना भाविकही झुलतात. त्या भक्तीतत्त्वाशी एकरूप होतात. एक क्षण देवी जिवंत झाल्याचा भास होतो. ऊर समाधानाने भरून येते. मंदिराच्या सभागृहातील खांब ते गर्भगृहापर्यंतचा परिसर, मंदिराला असलेल्या शेकडो वर्षांच्या परंपरेच्या प्रवासाचे प्रतीक आहे. खांबावरील कावी चित्रकला नाविन्यातही परंपरेचे वेगळेपण जतन करीत असल्याच्या खुणा इथे आहेत. विविध रंगांची वस्त्रे, वैविध्यपूर्ण कलाकुसर केलेले अलंकार, चौकोनी आकाराचे, विविध चित्रे, आरशांचे चौकोन, कलाकुसर केलेले मखर, त्याची सजावट, संगीत, भजन, कीर्तन याची वेगळीच धुंदी अनुभवताना मन प्रसन्न होते. परतीच्या प्रवासातही ती धून मनातळात वाजत रहाते. ते दोन डोळे रंध्रारंध्रात भिंनल्यासारखे वाटतात.

पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)