
फोंडा: फोंडा परिसर गव्यांना मानवू लागला असून, फोंडा शहरातही गवे ठाण मांडू लागले आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये दहशत पसरली आहे. गवे शेती, बागायतीची हानी करू लागल्यानंतर मानव व गवे यांच्यामधील संघर्ष अटळ ठरू लागला आहे.
गव्यांनी माणसांवर हल्ले करण्याच्या घटना घडल्या आहेत. २ ऑक्टोबरला सिल्वानगर, फोंडा येथे भर रस्त्यावर गवा फिरू लागल्यानंतर हा प्रश्न पु्न्हा ऐरणीवर येऊ लागला आहे. सप्टेंबर महिन्यात तर फोंडा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी गवे दिसले. एक गवा मरून पडलेला तर एक गवा दुखापतग्रस्त झालेला दिसला.
फोंड्यातील विविध भागात ऑक्टोबर, सप्टेंबर महिन्यात खालील ठिकाणी गवे दिसले.
सिल्वानगर,फोंडा: २ ऑक्टोबर, सिल्वानगर, फोंडा भर रस्त्यावर गवा दिसून आला.
फोंडा शहर: २६ सप्टेंबरला फोंडा शहरातील मारुती मंदिराजवळ रात्री गवा दिसून आल्यानंतर घबराट पसरली. वन खात्याने या गव्याला पुन्हा रानात पाठवले.
साकोर्डा: मधलावाडा, साकोर्डा येथे २६ सप्टेंबर रोजी बेशुद्धावस्थेतील गवा सापडला. वन खाते व डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा रानात सोडण्यात आले.
धारबांदोडा: २४ सप्टेंबरला गव्याने शेतीमळ व धारबांदोडा येथे दहशत माजवली. त्यामुळे जास्त करून दुचाकीचालकांना धोका निर्माण झाला. ऑक्टोबर, २०२४ मध्ये बोंडबाग, धारबांदोडा येथे गव्याच्या हल्ल्यात एक महिला ठार झाली होती.
वारखंडे: येथे जानेवारी ते सप्टेंबर, २०२५ पर्यंत वारखंडे अग्नीशमन दल व अप्पर बाझार येथे अनेक वेळा गवे दिसून आले.
बेतोडा: २६ सप्टेंबरला मेस्तावाडा, बेतोडा येथे काजू बागायतीत गवा मरून पडलेला सापडला. वय झाल्याने हा गवा दगावल्याचा संशय अधिकारी व्यक्त करीत आहेत.
ढवळी: फेब्रुवारी, २०२५ मध्ये ढवळी, फोंडा येथे श्री वाठादेव घुमटी जवळील रस्त्यावर गवा दिसून आला.
खाद्य मिळेनासे झाल्याने शहरात
जंगलतोडीमुळे गव्या रेड्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्याने गव्यांना खाद्य मिळत नाही. खाद्याच्या शोधात ते मानवी वस्तीत येत असल्याचे वन खाते व प्राणी प्रेमींचे म्हणणे आहे. गवे मानवी वस्तीत दिसू लागताच पुन्हा त्यांना रानात सोडणे हा एकच उपाय वनखात्याकडे आहे. गवे मानवी वस्तीत, रस्त्यांवर येऊ नयेत म्हणून उपाययोजना हाती घेण्याची मागणी त्रस्त लोक करीत आहेत. समांतर वन्यजीव अधिवास कॉरिडर स्थापन करावा, असे पर्यावरणप्रेमी सूचवत आहेत.