न्यायालयाने ठोठावली ९ दिवसांची 'ईडी'ची कोठडी.

पणजी: जमीन हडपप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. 'ईडी'च्या पणजी विभागीय कार्यालयाने या प्रकरणातील मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या शिवशंकर मयेकर याला १ ऑक्टोबर २०२५ रोजी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली. मयेकरला २ ऑक्टोबर २०२५ रोजी म्हापसा येथील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने संशयिताला १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत नऊ दिवसांची 'ईडी' कोठडी सुनावली आहे.
हणजुण कोमुनिदादच्या जमिनीत अपहार
गोवा पोलिसांनी यशवंत सावंत आणि इतरांविरुद्ध हणजुण कोमुनिदादच्या जमिनीसंदर्भात (सर्वे क्र. ४९६/१-अ) फसवणूक केल्याप्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे 'ईडी'ने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या आरोपींनी संबंधित प्राधिकरणांकडे बनावट आणि खोटे दस्तऐवज सादर करून ही जमीन आपल्या नावावर केली होती. त्यानंतर या जमिनीचा काही भाग विकून त्यातून मोठी रक्कम (Proceeds of Crime) मिळवली होती.
मयेकरची प्रमुख भूमिका
'ईडी'च्या तपासानुसार, या संपूर्ण फसवणुकीमागे शिवशंकर मयेकर हा प्रमुख व्यक्ती असल्याचे उघड झाले आहे. त्याने आपल्या मित्र तसेच नातेवाईकांच्या नावावर गोव्यातील अनेक जमिनीच्या भूखंडांचे अवैधपणे संपादन केले होते. नंतर या जमिनींचा काही भाग विकून आलेले पैसे मित्र-नातेवाईकांच्या खात्यात जमा केले आणि त्यानंतर ते सर्व पैसे अखेरीस शिवशंकर मयेकरने स्वतःच्या खात्यात वळवले.
प्रकरणाची व्याप्ती १,२०० कोटींपेक्षा जास्त
यापूर्वी ९ सप्टेंबर २०२५ रोजी 'ईडी'ने केलेल्या शोध मोहिमेत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या होत्या. मयेकर याने हणजुण, आसगाव (बार्देश तालुका) सारख्या प्रमुख पर्यटन स्थळांवर मित्र-नातेवाईकांच्या नावावर लाखो चौरस मीटर पसरलेले अनेक भूखंड अवैधपणे बळकावल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी बळकावलेल्या या जमिनींच्या भूखंडांचे बाजारपेठेतील एकूण मूल्य १,२०० कोटींहून अधिक असण्याची शक्यता आहे. 'ईडी'कडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे