रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी आंदोलन : पणजीतील वाहतूक विस्कळीत, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थिती नियंत्रणात
आझाद मैदानानजीक रस्त्यावर उतरलेले आंदोलक. त्यांना अडवताना पोलीस. त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकार यांच्यावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या आमदारांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी काही काळ दयानंद बांदोडकर मार्ग अडवून धरला. त्यामुळे पणजीतील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन मास्टरमाईंडला शोधण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानावर काही समाज कार्यकर्त्यांनी सभेचे आयोजन केले होते. या सभेला विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, गोवा फॉरर्वडचे आमदार विजय सरदेसाई, ‘अाप’चे आमदार व्हेन्झी व्हिएगस, आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर, खासदार विरियातो फर्नांडिस यांच्यासह राजकीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा संपल्यानंतर हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण, याचे उत्तर पोलीस महासंचालकांकडून मिळवण्यासाठी आंदोलकांनी पोलीस मुख्यालयाला घेराव घातला. पोलीस महासंचालकांची भेट न झाल्याने आंदोलकांनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील बंगल्याकडे वळवला. पोलिसांनी हा मोर्चा चर्च स्क्वेअर येथे अडवला. तेथेच आंदोलकांनी रास्तो रोको आरंभले. मुख्यमंत्र्यांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलक मोर्चाने जुन्या सचिवालयाजवळ आले. तेथे त्यांनी दयानंद बांदोडकर मार्गावरील वाहतूक अडवली.
पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आंदोलकांना मुख्यमंत्री भेटण्यास तयार असल्याचे सांगितले. त्याबरोबर सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे गेले. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना शिष्टमंडळ पाठवण्याची सूचना केली. काहींनी मुख्यमंत्र्यांनी सर्वांसमोर येऊन बोलावे, अशी मागणी केली. त्यामुळे थोडा गोंधळ उडाला. अखेर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह काही आमदार आणि समाज कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. बैठकीनंतर शिष्टमंडळाने सांगितले की, मुख्यमंत्री रामा काणकोणकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गोमेकॉत जाणार आहेत. हल्ल्यातील मास्टरमाईंडला दोन दिवसांत जेरबंद केले जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. अधीक्षक राहुल गुप्ता यांनी या प्रकरणातील तपासाबद्दल दर २४ तासांनी प्रसारमाध्यमांना माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे.
हल्लेखोरांवर कलम ३०७ अन्वये गुन्हा नाेंदवणे, एनएसए कायद्यानुसार कारवाई करणे आणि हद्दपार करण्याच्या शिष्टमंडळाच्या मागणीवर विचार केला जाईल. गोव्यातून गँगवारचे उच्चाटन करण्यासाठी पोलिसांना मोकळीक दिली आहे. मास्टरमाईंडला लवकरच अटक केली जाईल.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
जामिनावर सुटलेल्या हल्लेखोरांवर एनएसए कायद्याखाली कारवाई करा.
हल्लेखोरांवर कलम ३०७ नुसार गुन्हा नोंदवा.
हल्लेखोरांना गोव्यातून हद्दपार करा.
हल्ल्यामागील मास्टरमाईंडला जेरबंद करा.
रामा काणकोणकर आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या.
राजकारणी आणि गुंड यांच्यातील संबंध शोधण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करा.
आंदोलकांत दोन गट; राजकारण्यांना रोखले
आंदोलनावेळी समाज कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले. काही जणांनी आंदोलनातील विरोधी आमदारांच्या सहभागावर आक्षेप घेतला. सभेत विरोधी आमदार बोलत असताना आंदोलनात राजकारण कशासाठी, असा प्रश्न विचारून काहींनी गोंधळ घातला. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला.
वाहतूक ठप्प, शालेय मुलांना उपास, रुग्णांचीही परवड
आंदोलकांनी दयानंद बांदोडकर रस्ता अडवून धरल्याने संपूर्ण शहरातील वाहतूकच ठप्प झाली. शाळा सुटण्याच्या वेळीच आंदोलन झाल्याने शालेय मुलांना घरी जायला उशीर झाला. परिणामी ते बराच वेळ उपाशी राहिली. हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटायला जाणाऱ्यांनाही आंदोलकांनी रोखून धरले. काही पर्यटकांचे विमान चुकले. काही प्रवाशांनी त्यांना जाऊ देण्याची विनंती केली असता आंदोलकांनी त्यांनाच धमकावले. पोलिसांनी यावेळी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला; परंतु आंदोलकांनी पोलिसांशीही धक्काबुक्की केली.
मास्टरमाईंडला गजाआड न केल्यास राज्यभर आंदोलन : गाकुवेध
रामा काणकोणकर हल्ल्यातील मास्टरमाईंडला दोन दिवसांत गजाआड केले नाही, तर ‘गाकुवेध’ संघटना राज्यभर जनआंदोलन उभारेल, असा इशारा अॅड. सुरेश पालकर यांनी दिला. पणजीत आझाद मैदानावरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, हल्ल्यातील सहावा आरोपी शोधला नाही तरी चालेत; पण मास्टरमाईंडला शोधा. या प्रकरणातील राजकीय नेत्याचे नाव जाहीर करा. नाहीतर आम्ही जाहीर करू. या प्रकरणातील पुरावे पोलीस नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मारहाणीत वापरलेल्या हत्यारांचा पंचनामा करताना पोलिसांनी ती बाजूला काढून ठेवली. पंचनाम्यावेळी बंधनकारक असूनही पोलिसांनी व्हिडिओ रिकॉर्डिंग केले नाही. हल्ल्यातील मास्टरमाईंडचे बंगले फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. आम्ही संयम बाळगून आहोत. तपास पूर्ण होईपर्यंत ‘गाकुवेध’ पाठपुरावा करेल.
आणखी दोघे गजाआड; अटक केलेल्यांची संख्या झाली सात
रामा काणकोणकर यांच्यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी फ्रांको डिकॉस्टा (२८, सांताक्रूझ) आणि साईराज गोवेकर (२८, पिळर्ण) यांना अटक केली. गुरुवारी रात्री अटक केलेल्या पाच संशयितांना मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने शुक्रवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. मुख्य सूत्रधाराबाबत पोलीस चौकशी करत आहेत. रामा काणकोणकर यांच्यावर करंझाळे येथे गुरुवारी दुपारी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी सोयरू वेळीप यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुरुवारी रात्री अॅथनी नादार, फ्रान्सिस नादार, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर आणि सुरेश नाईक यांना अटक केली होती. यातील दोघांना दोडामार्ग बसस्थानकाजवळून, तर तिघांना कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असताना मडगाव रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेतले होते. अटक केलेल्या सात संशयितांपैकी फ्रांको डिकॉस्टा वगळता इतर सहाजण सराईत गुन्हेगार आहेत.