सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
सिंगापूर : प्रसिद्ध बॉलीवूड गायक झुबीन गर्ग (५२) यांचे सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना विचित्र अपघातात निधन झाले. मूळचे आसामचे असलेले झुबीन २० आणि २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल’साठी सिंगापूरला गेले होते. या फेस्टिव्हलमध्ये झुबीन परफॉर्म करणार होते.
झुबीन गर्ग यांना अपघातानंतर समुद्रातून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे सीपीआर देण्यात आला, पण सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वा. त्यांची प्राणज्योत मालवली.
झुबीन गर्ग यांच्या निधनाची बातमी कळवताना आम्हाला खूप दुःख होत आहे. स्कूबा डायव्हिंग करताना त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी सीपीआर देण्यात आला. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करूनही, दुपारी २.३० च्या सुमारास आयसीयूमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे प्रतिनिधी अनुज कुमार बोरुआ यांनी सांगितले.
झुबीन गर्ग यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिंदी, बंगाली व आसामी गाणी गायली. २००६ मध्ये आलेल्या इमरान हाश्मीच्या ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘या अली’ या गाण्याने झुबीन गर्ग यांना लोकप्रियता मिळाली होती.