भाटीकर दाम्पत्याच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन : सोहळ्याला ज्ञानपीठ विजेते दामोदर मावजो यांची उपस्थिती
कार्यक्रमात तीन पुस्तकांचे प्रकाशन करताना सुप्रसिद्ध उद्योजक अवधूत तिंबलो, दामोदर मावजो, अरविंद भाटीकर, स्नेहलता भाटीकर व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भारताची लोकशाही नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश या देशांसारखी लेचीपेची नाही. ती अमेरिकेच्या लोकशाहीप्रमाणे मजबूत आहे. त्यामुळे भारतात नेपाळ, श्रीलंकेप्रमाणे उद्रेक होणे शक्य नसले तरी राज्यात २०२७ मध्ये लोकशाही मार्गाने परिवर्तन अटळ आहे, असे मत सुप्रसिद्ध उद्योजक अवधूत तिंबलो यांनी व्यक्त केले. अरविंद भाटीकर यांच्या ‘मड्यांची सोसायटी’ आणि स्नेहलता भाटीकर यांच्या ‘म्हजें रायबन’ पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.
या सोहळ्याला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो प्रमुख पाहुणे म्हणून, तर प्रा. उर्वशी नायक हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी स्नेहलता भाटीकर यांच्या ‘सुकणींच सुकणी’ या भाषांतरित पुस्तकाचेही प्रकाशन झाले. उद्योजक तिंबलो पुढे म्हणाले, आज मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे इंग्लंडमध्ये भ्रष्टाचार आणि गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचार कमी होत आहे. विविध कारणांमुळे राज्यावरीले कर्ज वाढत आहे. सध्या गोव्यावर ४० हजार कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज ७.५ टक्के व्याजदराने फेडावे लागते. बेजबाबदार नेते, तकलादू धोरणे यामुळे भ्रष्टाचार वाढत आहे. अत्याचार, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीविरोधात काहीच न करणाऱ्यांना भाटीकर यांनी ‘मड्यांची सोसायटी’ म्हटले आहे. अशा लोकांना भ्रष्ट मडी असे म्हणणे सयुक्तिक ठरेल.
उर्वशी नायक यांनी तिन्ही पुस्तकांची माहिती दिली. ‘मड्यांची सोसायटी’मध्ये थ्रील आहे. ‘म्हजें रायबन’मधून रायबंदरचा इतिहास आणि भूगोल कळणे सोपे होईल. स्नेहलता भाटीकर यांच्या नातीने इंग्लिशमधून लिहिलेल्या ‘बर्डस ऑफ फेदर’ पुस्तकाचा कोकणी अनुुवाद म्हणजे ‘सुकणींच सुकणीं’ पुस्तक, असे उर्वशी नायक यांनी सांगितले.
लेखक अरविंद भाटीकर आणि स्नेहलता भाटीकर यांनी मनोगत व्यक्त केले. मेघना कापडी यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश मणेरकर यांनी स्वागत केले. श्रेया बोरकर यांनी आभार मानले.
भाटीकर यांची कादंबरी सत्यघटनेवर आधारित : मावजो
अरविंद भाटीकर यांची कादंबरी सत्यघटनेवर आधारित आहे. वाढता भ्रष्टाचार वा निष्क्रिय समाजाविषयी भाटीकरांना चीड आहे. हा संताप ‘मड्यांची सोसायटी’ कादंबरीतून व्यक्त झाला आहे, असे दामोदर मावजो यावेळी म्हणाले.