मुख्यमंत्र्यांची माहिती : ९५० जणांना नियुक्ती पत्रे प्रदान
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : प्राथमिक शिक्षकांच्या ५०० जागा सध्या कंत्राटी तत्त्वावर भरल्या आहेत. पुढील सहा महिन्यात कर्मचारी भरती आयोगातर्फे या जागा कायमस्वरूपी पद्धतीने भरल्या जातील. आयोगातर्फे पुढील काळात विविध खात्यांतील अडीच हजार पदे भरली जातील. येत्या दोन वर्षांत मनुष्यबळ विकास महामंडळात ५ हजार जणांची भरती केली जाणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. शुक्रवारी पणजीत सेवा पखवाडानिमित्त ९५० जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, पेयजलमंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंद शेट तानावडे व अन्य आमदार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नोकर भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने गोवा लोकसेवा आयोग व कर्मचारी भरती आयोगाची स्थापना केली आहे. आज कंत्राटी नियुक्तीपत्रे मिळालेल्यांना पुढील काही महिन्यांत कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळणार आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षांना पर्याय नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. युवकांनी केंद्रीय लोकसेवा आयोग, बँकांच्या जागांसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसापासून तयारी सुरू करावी.
मुख्यमंत्री म्हणाले, गोवा मनुष्यबळ विकास महामंडळामध्ये आज २२० जणांना नोकरी देण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांत महामंडळामध्ये ५ हजार जणांना नोकरी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारने महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी दिली आहे. त्यांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच रजा, बोनस व अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना पुढील शिक्षणासाठीही महामंडळातर्फे मदत देण्यात येते. यामुळे महामंडळामध्ये काम करू इच्छिणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे.
लोकांसाठी काम करा : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले की, आज नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आस्था आणि आपुलकीने काम करणे आवश्यक आहे. आपण लोकांच्या मदतीसाठी काम करत आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. कर्मचाऱ्यांनी योग्य पद्धतीने काम केल्यास याचा फायदा लोकांना होईल.