कृषी संचालक संदीप फळदेसाई यांची ग्वाही
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्याच्या हद्दीत प्रवेश केलेल्या ‘आेंकार’ हत्तीने तांबोशे, मोपा, तोरसे परिसरातील शेती व बागायतीची मोठी हानी केली आहे. तांबोशे, तोरसे परिसरात हत्तीने उच्छाद मांडला असून शेतीचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. पाहणी तसेच सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई निश्चितपणे मिळेल, अशी ग्वाही कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात आलेल्या हत्तीला मूळ ठिकाणी परतवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. हत्तीमुळे मोपा व आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण असतानाच शेतीचेही नुकसान होत आहे. शेतीच्या नुकसानीबाबत खात्याने सर्वेक्षण सुरू केलेले नाही. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज भरून ते विभागीय कार्यालयात देणे आवश्यक आहे. अर्ज येतील तशी नुकसानीची पाहणी केली जाईल. नुकसान झाले असल्यास ‘शेतकरी आधार निधी’अंतर्गत आर्थिक मदत दिली जाईल. प्रति हेक्टर ४० हजार रुपये याप्रमाणे मदत देण्याची तरतूद योजनेत आहे. हत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले असले तरी अद्याप कोणीही कृषी खात्याशी संपर्क साधलेला नाही, असे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगिले.
तांबोशे व तोरसे भागात हत्तीने शेतीचे बरेच नुकसान केल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली आहे.