भूकंप, भूस्खलन, हिमस्खलन, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मानवी जीवनावर मोठे प्रतिकुल परिणाम होतात. विशेषकरून उत्तरेकडील राज्यांमध्ये भूस्खलन वारंवार होत असल्याचे दिसून येते. या भूस्खलनात मालमत्तांचे मोठे नुकसान होतेच; परंतु मनुष्यहानीही मोठी होते. भूस्खलनात बहुतेकवेळा पूर्ण गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जाते. दोन वर्षांपूर्वी उत्तराखंडमधील जोशीमठ या गावावर ही आपत्ती आली होती. आता चमोली जिल्ह्यातील नंदनगर घाट पूर्णपणे जमीनदोस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाने कहर केला. यामुळे नद्यांना महापूर आले. काही ठिकाणी भूस्खलनही झाले. सततच्या पावसाने आणि भूस्खलनाने नंदनगर शहराचा पाया हादरला आहे. घराच्या भिंतींना, जमिनीवर मोठ्या भेगा पडल्या आहेत. एकाच रात्रीत शहरातील ८ घरे कोसळली. धोका लक्षात घेऊन प्रशासनाने शहरातील ३४ कुटुंबांना स्थलांतरित केले. बाजारपेठेतील ४० दुकानेही कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांतील साहित्य इतरत्र हलवले आहे.
जानेवारी २०२३ मध्ये जोशीमठमध्ये भूस्खलन होऊन ८०० हून अधिक घरांमध्ये मोठ्या भेगा पडल्या होत्या. प्रशासनाने जोशीमठमधील सुमारे १८१ इमारती रिकामी केल्या होत्या. भेगा पडलेल्या ६७८ घरांवर लाल रंगाने चिन्हांकित करून त्यांना राहण्यास धोकादायक घोषित केले होते.
१९७६ मध्ये गढवालचे आयुक्त एम. सी. मिश्रा यांच्या समितीने जोशीमठबाबत मोठा इशारा दिला होता. जोशीमठवर केलेल्या अभ्यासानंतर, समितीने हे क्षेत्र उच्च जोखीम क्षेत्र-५ मध्ये येते, असे स्पष्ट केले. हा परिसर डोंगरावरून खाली आलेल्या १० किलोमीटर लांबीच्या ढिगाऱ्यावर वसला आहे. याची माती खूपच कमकुवत आहे. प्रत्येक ढिगाऱ्याची भार सहन करण्याची क्षमता असते. येथील कोणतेही मोठे बांधकाम धोकादायक ठरू शकते. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण (जीएसआय)ने दोन वर्षांपूर्वी केंद्राला आपला तपास अहवाल सादर केला होता. त्यात म्हटले आहे की, पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था खराब असल्याने, उतारांवर बांधकामे आणि अनेक शहरे वसवल्यामुळे जोशीमठमधील जमीन पोकळ होत आहे. जोशीमठमधील जमीन खचणे आणि घरांना भेगा पडण्यासाठी जलविद्युत प्रकल्प आणि परिसरातील मोठ्या प्रमाणातील बांधकामे कारणीभूत आहेत. ४९ वर्षांपूर्वी मिश्रा समितीने त्यांच्या अहवालात हेच मुद्दे उपस्थित केले होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालांकडे दुर्लक्ष करणे मोठ्या संकटाला निमंत्रण दिल्यासारखे असते. नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी संकेत देत असतात. ते वेळीच ओळखून त्यावर तातडीने उपाय योजले, तर नैसर्गिक आपत्ती टाळणे शक्य होऊ शकते.
- प्रदीप जोशी,
(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)