कॅसिनो जहाजाच्या तळाची स्वच्छता करताना डायव्हरचा बुडून मृत्यू

मांडवी नदीपात्रातील दुर्घटना

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
04th September 2025, 12:35 am
कॅसिनो जहाजाच्या तळाची स्वच्छता करताना डायव्हरचा बुडून मृत्यू

पणजी : मांडवी नदीपात्रात उतरून कॅसिनो जहाजाच्या तळाची स्वच्छता करण्याचे काम करणाऱ्या एका निष्णात डायव्हरचा (पाणबुड्या) दुर्दैवी मृत्यू झाला. या खासगी डायव्हरचे नाव क्लेरेन्स डिसोझा (४२) असून तो  हळदोणाचा रहिवासी होता. 

या प्रकरणी पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. डेल्टिन जॅक कॅसिनो या बोटीचे कर्मचारी उदय राज सिंग चौहान आणि राजकुमार यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, क्लेरेन्स हा व्यावसायिक अंडरवॉटर डायव्हर होता. तो पाण्यात जाऊन जहाज स्वच्छ करण्याचे काम खासगीरीत्या करत असे. बोट स्वच्छ करण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली. त्यानंतर क्लेरेन्स आणि त्याचा सहाय्यक नेहमीप्रमाणे एकमेकांच्या संपर्कात होते. दर १५ मिनिटांनी क्लेरेन्सच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सहाय्यक दोरी ओढत असे. त्यानुसार ४ वेळा सहाय्यकाने दोरी ओढली, ज्याला क्लेरेन्सने प्रतिसाद दिला. पाचव्या वेळी जेव्हा सहाय्यकाने दोरी ओढली, तेव्हा क्लेरेन्सकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने ताबडतोब क्लेरेन्सला समुद्राच्या पाण्यातून बोटीच्या पृष्ठभागावर ओढले. तेव्हा क्लेरेन्स बेशुद्ध असल्यामुळे सीपीआर देण्यात आला आणि काम्पाल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

पणजी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शाहीन शेटये यांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, क्लेरेन्स हा निष्णात पाणबुड्या म्हणून परिचित होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा