तरुणाई आणि सोशल मीडियाचे व्यसन

या व्यसनाचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. सतत मोबाईल वापरण्यामुळे डोळ्यांची समस्या, मानेचा त्रास, झोपेचा अभाव, स्थूलता यांसारख्या शारीरिक समस्या उद्भवतात. सतत ऑनलाइन राहिल्याने चिंता, नैराश्य आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो.

Story: लेखणी |
08th August, 10:23 pm
तरुणाई आणि सोशल मीडियाचे व्यसन

सोशल मीडियाच्या व्यसनात अडकत चाललेली तरुणाई

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर, स्नॅपचॅट, यूट्यूब यांसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे जगभरातील लोक एकमेकांशी जोडले जात आहेत. मात्र, या तंत्रज्ञानाचा अतिरेक झाल्याने विशेषतः तरुण पिढी सोशल मीडियाच्या आहारी जात आहे. मनोरंजन आणि ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा प्रवास हळूहळू व्यसनात बदलत आहे. सोशल मीडिया व्यसन म्हणजे एखाद्या व्यक्तीला सतत सोशल मीडियावर राहण्याची सवय लागणे, त्याशिवाय अस्वस्थ वाटणे आणि त्यामुळे दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम होणे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, दररोज किमान चार तास किंवा त्याहून अधिक वेळ सोशल मीडियावर घालवणाऱ्या तरुणांचा आकडा ७०% पर्यंत पोहोचला आहे. याचा अर्थ, बहुतांश तरुण त्यांच्या शालेय, महाविद्यालयीन आणि वैयक्तिक आयुष्यात सोशल मीडियाच्या विळख्यात अडकले आहेत. अनेक तरुण तासन्तास मोबाईलमध्ये गुंग असतात. पोस्ट पाहणे, लाईक्स मिळवणे, कमेंट्स करणे, व्हिडिओ पाहणे, रील्स बनवणे यांमध्ये ते इतके अडकून पडतात की त्यांचे वैयक्तिक, शैक्षणिक आणि सामाजिक जीवन विस्कळीत होते.

व्यसनाची कारणे आणि दुष्परिणाम

सोशल मीडिया व्यसनाची अनेक कारणे आहेत. स्मार्टफोनमुळे इंटरनेट सहज उपलब्ध झाले आहे, त्यामुळे कुठेही, केव्हाही सोशल मीडिया वापरणे शक्य होते. लाईक्स, कमेंट्स, शेअर्स यामुळे तात्पुरता आनंद मिळतो आणि लोकांना आपली प्रसिद्धी वाढल्याचा भास होतो. व्हिडिओ, मीम्स, मजेशीर पोस्ट यामुळे तरुणांना सतत काहीतरी नवीन पाहण्याची चटक लागलेली असते. मित्रांपेक्षा अधिक फॉलोअर्स कसे वाढवता येतील, हीच स्पर्धा तरुणांमध्ये आज दिसून येते. काही जण तर सोशल मीडियाचा वापर फक्त मन रमवण्यासाठीच करतात. वास्तविक जीवनातील समस्या विसरण्यासाठी ते सतत मोबाईलचा वापर करत असतात. टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये अनेकदा सोशल मीडिया व्यसनामुळे झालेल्या दुष्परिणामांबद्दल दाखवले जाते. उदाहरणार्थ, काही महिन्यांपूर्वी एका वृत्तवाहिनीवर अशी घटना दाखवली गेली की एका सोळा वर्षीय मुलाने आपल्या मित्राच्या इंस्टाग्राम पोस्टला कमी लाईक्स मिळाल्यामुळे त्याच्याशी वाद घातला आणि त्याचे प्राण घेण्याचा प्रयत्न केला. अशा घटना हे दाखवतात की सोशल मीडिया व्यसन मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम करू शकते. एकीकडे अनेक तरुण सोशल मीडियावर आपला अमूल्य वेळ वाया घालवत आहेत, तर दुसरीकडे काही जण या प्लॅटफॉर्मचा उपयोग सकारात्मक पद्धतीने करत आहेत. उदाहरणार्थ, काही नवउद्योजक आणि कलाकार सोशल मीडियाचा उपयोग आपल्या कलेचा प्रसार करण्यासाठी करतात. मात्र, यासाठी नियंत्रण आणि समतोल आवश्यक आहे.

लक्षणे आणि उपाययोजना

आज सोशल मीडिया व्यसनाची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. थोड्या थोड्या वेळाने फोन उघडून सोशल मीडिया तपासणे, ऑनलाइन राहण्याची तीव्र इच्छा, वेळेचे भान न राहता तासन्तास मोबाईलवर राहणे, डोळ्यांचे नुकसान, झोपेच्या वेळेचा बिघाड, एकाग्रतेचा अभाव, चिडचिड वाढणे आणि सोशल मीडियावर अधिक वेळ घालवल्याने कुटुंबीय व मित्रांशी संवाद कमी होणे ही काही लक्षात घेण्यासारखी लक्षणे आहेत. शिवाय, अनेक मुलांना रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याची सवय लागली आहे, ज्यामुळे त्यांच्या झोपेच्या वेळेमध्ये मोठा व्यत्यय येतो. एका रिपोर्टनुसार, ६०% पेक्षा जास्त किशोरवयीन मुलांना सोशल मीडिया व्यसनामुळे निद्रानाशाचा त्रास होतो.

या व्यसनाचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. सतत मोबाईल वापरण्यामुळे डोळ्यांची समस्या, मानेचा त्रास, झोपेचा अभाव, स्थूलता यांसारख्या शारीरिक समस्या उद्भवतात. सतत ऑनलाइन राहिल्याने चिंता, नैराश्य आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचे गुण कमी होतात. प्रत्यक्ष संवाद कमी झाल्याने लोक एकलकोंडी होतात आणि त्यांची सामाजिक कौशल्ये कमी होतात. एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख येथे करता येईल. एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने सोशल मीडियावरील आव्हान स्वीकारण्यासाठी धोकादायक स्टंट केला आणि त्यात आपले प्राण गमावले. अशा प्रकारच्या घटनांमुळे सोशल मीडिया किती घातक ठरू शकतो, याचा प्रत्यय येतो. सोशल मीडियावर दाखवली जाणारी कृत्रिम चमकधमक पाहून तरुण त्याचे अनुकरण करतो आणि वास्तविक आयुष्यात निराश होतो.

व्यसनातून बाहेर पडण्याचे मार्ग

सोशल मीडिया व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही उपाय अवलंबणे आवश्यक आहे. ठराविक वेळच सोशल मीडियावर घालवा आणि त्याचा अतिरेक होऊ देऊ नका. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे लक्ष विचलित होते, त्यामुळे अनावश्यक सूचना बंद करा. मित्र, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटीगाठी वाढवा. वाचन, संगीत, मैदानी खेळ, जिम, ध्यानधारणा यांसारख्या सकारात्मक गोष्टींमध्ये लक्ष द्या. पालकांनी मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पालकांनी स्वतः मुलांसमोर योग्य उदाहरण ठेवल्यास ते मुलांना मार्गदर्शन करू शकतात. पालक आणि शिक्षकांनी मुलांशी चर्चा करून त्यांना सोशल मीडियाच्या अतिरेकाचे दुष्परिणाम समजावून सांगितले पाहिजेत.

समाज आणि सरकारनेही सोशल मीडिया व्यसन रोखण्यासाठी काही उपाय करायला हवेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सोशल मीडिया व्यसनाचे धोके यावर सखोल चर्चा व्हायला हवी. सरकारनेदेखील सोशल मीडिया कंपन्यांवर काही मर्यादा आणायला हव्यात, जसे की विशिष्ट वयाखालील मुलांसाठी काही प्रतिबंध लावणे. सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन असले तरी त्याचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे. काही दिवस सोशल मीडियापासून पूर्णतः दूर राहण्याचा प्रयत्न करा. आत्मशिस्त पाळा आणि अनावश्यक स्क्रोलिंग टाळा. तरुणांनी याचा वापर माहिती मिळवण्यासाठी आणि सकारात्मक संवादासाठी करावा. आत्मशिस्त आणि योग्य नियोजनाच्या मदतीने सोशल मीडिया व्यसनावर नियंत्रण ठेवता येते. वेळ आणि ऊर्जेचा योग्य वापर केल्यास तरुणाईचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते. तरुणांनी आपल्या वास्तव आयुष्याला अधिक महत्त्व द्यावे आणि डिजिटल दुनियेतील आभासी चमकधमकच्या आहारी जाऊ नये. सोशल मीडियाचा योग्य वापर हेच त्यावरचे उत्तम उत्तर आहे.


- वर्धा हरमलकर  

भांडोळ