बडवे बाईंची शाळा

आजच्या वेगवान जगात, काही व्यक्तींचे कर्तृत्व त्यांच्या नावापेक्षाही मोठे असते. अशाच एक आदर्श शिक्षिका, बडवे बाई. केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे, तर त्यांच्या पालकांचेही आयुष्य घडवणाऱ्या, या कर्तृत्ववान मुख्याध्यापिकेची ही कथा.

Story: व्यक्ती एके व्यक्ती |
08th August, 10:21 pm
बडवे बाईंची शाळा

नुकतीच आमच्या बडवे बाईंची ऐंशी वर्ष पूर्ण झाली. ऐंशी वर्षे? अरे बापरे! आणि तीसुद्धा अगदी ठणठणीत चणी आणि खणखणीत वाणी सांभाळून? अहो आजकालच्या बर्गर-पिझ्झामय जगात, शुद्ध मराठी भाषेत सांगायचे तर 'इम्पॉसिबल'!

थोडक्यात, बडवे बाई म्हणजे काय, याचा अंदाज वाचकांना थोडा आलाच असेल. सौ. लताताई बडवे, आमच्या मुलींच्या पहिल्या-वहिल्या शाळेच्या प्राथमिकच्या (प्रायमरी) मुख्याध्यापिका. उपनगरात नुकतेच राहायला आलो होतो आम्ही. मुलीचे शाळेचे वय झाले होते. आम्ही तसे नवीनच त्या भागात. चार जणांना विचारले तर प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर, "बडवे बाईंची शाळा एकदम मस्त, खुशाल पाठवा तिला." आता सगळीकडून एकच नाव येतेय म्हटल्यावर ठरवले आणि पोहोचलो बडवे बाईंच्या शाळेत.

खरे तर शाळेचे नाव स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, पण सगळे तिला बडवे बाईंची शाळा असेच म्हणत, अगदी रिक्षावालेसुद्धा. शाळेत पोहोचलो, सकाळी राष्ट्रगीत चालू होते. एवढ्या शुद्ध आणि स्पष्ट उच्चारात 'जन गण मन' मी पहिल्यांदा ऐकले. अख्ख्या शाळेत 'पिन ड्रॉप सायलेन्स' आणि फक्त राष्ट्रगीत चालू.

थोड्या वेळाने आम्हाला ऑफिसमध्ये बोलावणे आले. गेलो. मुख्य खुर्चीत एक पन्नासच्या आसपासची, तोंडावर कडकपणा दिसणारी, अधिकारी वाटणारी स्त्री बसली होती. आम्हाला पाहताच, "या.. बसा," असे सस्मित स्वागत झाले. त्याच वेळी राष्ट्रगीत गायक कोण हे कळले. असो! औपचारिकता पार पडली. बाईंनी मुलीला काही प्रश्न विचारले. मध्येच मी काहीतरी बोलले, तत्क्षणी समोरून विचारणा झाली, "अ‍ॅडमिशन कोणाची करायची? हिची का तुमची?" माझा चेहरा पडला. अर्थात, मिस्टरांच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू उमटले हे नक्की.

अर्थात, प्रथमदर्शनी कडक वाटणाऱ्या बडवे बाई, शाळा जशी चालू झाली तशा समजू लागल्या मला. आमच्या मुलीच्या शाळेत एक दंडक होता. दुपारी टिफिनमध्ये चपाती-भाजी आणण्याचा. फारफार तर भाकरी हा चेंज... अर्थात, सुरुवातीला जरा जड गेले पण नंतर बाईंचा हा नियम किती गरजेचा आहे हे कळले. बाई नेहमीच सांगायच्या, "सगळ्यांना डब्यात सारखे जेवण असेल तर समानता राहते हो मुलांमध्ये! तसेच पचनालाही सोपे." पटले मला. अर्थात, काही पालकांना रोज चपाती देणे परवडणारे नव्हते, त्यांच्या पाल्यांसाठी बाई स्वतः चार पोळ्या जास्त आणत. कोण वर्गशिक्षिका करतील हो आजच्या जमान्यात तुम्ही सांगा बरं? तो जमाना वेगळाच आणि ते शिक्षकही वेगळेच.

हळूहळू बाईंशी ओळख वाढू लागली. शाळेत काही कार्यक्रम बसवण्यासाठी माझे जाणे होई. तेव्हा कळायला लागल्या मला बडवे बाई. एक आदर्श शिक्षकाच्या घरात जन्मलेल्या बाईंना जन्मतः बाळकडूच शिक्षणाचे मिळाले. त्यात घरात वातावरण कडक आणि धार्मिक. बाईंना सर्व पोथ्या, पुराणे अगदी तोंडपाठ. प्राथमिकला बडवे बाई असेपर्यंत श्लोक, कविता वाचन स्पर्धेत प्रथम, द्वितीय पारितोषिके ही ठरलेलीच.

स्वतः बाई मराठी शिकवायच्या. स्पष्ट शब्दोच्चारवर त्यांचा जास्त भर. 'आई' ह्या शब्दाचे शास्त्रीय महत्त्व त्यांनी मला सांगितले. मूल जेव्हा सतत 'आई, आई' करते, त्यावेळी त्याच्या तोंडाच्या स्नायूंची विशिष्ट हालचाल होते, ज्याचा उपयोग मोठे झाल्यावर स्पष्ट उच्चार येण्यासाठी होतो असे त्यांचे म्हणणे. आणि मला तरी ते योग्य वाटते.

अभ्यासात कडक असणाऱ्या बडवे बाई मुलांना शिक्षासुद्धा अभिनव करीत. पाच वेळा श्लोक म्हणणे, शाळेला एक फेरी मारणे, अशा त्या शिक्षा. पण पट्टीने मारणे, ओणवे उभे करणे असले प्रकार नाहीतच. अर्थात, बडवे बाईंच्या वर्गात शिक्षा हा प्रकार तसा कमीच. बडवे बाईंचे यजमान निवृत्त 'नेव्हीमॅन' होते. शारीरिक शिक्षण हा त्यांचा विषय. ते शाळेत विनामूल्य कबड्डी, खो-खो असे खेळ शिकवीत. अर्थात ही योजना बाईंचीच. असो! थोडेसे मर्दानी व्यक्तिमत्त्व असलेल्या बाई खो-खो खेळायला लागल्या की त्यांची चपळता पाहण्यासारखी असे.

शिक्षणाबरोबर सामाजिक जबाबदाऱ्यांची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात त्यांचा हातखंडा. पुस्तक जत्रा, जुन्या युनिफॉर्मचे संकलन असे अनेक उपक्रम त्यांनी शाळेत चालू केले. मागे एका समारंभात एक प्रसिद्ध राजकारणी भेटले होते. सहज त्यांच्या बोलण्यातून आले की ते बडवे बाईंचे विद्यार्थी. मग मी माझी ओळख सांगितली. काय भरभरून बोलले हो ते बडवे बाईंच्या विषयी! अगदी आपला किमती वेळ विसरून.

आजही बाईंच्या वाढदिवसाला अनेक जुने विद्यार्थी, पालक आले होते. काही तर नुसते माहिती झाल्यावर न बोलावता आले होते. कार्ड, मेसेजचा नुसता खच पडला होता. आता बाई आपल्या मुलाकडे राहतात. नातवंडे झाली बाईंना. खूश दिसत होत्या. समारंभात त्यांच्या दोन वर्षाच्या नातवाने आपल्या मम्मीला "आई" म्हणून हाक मारली. सगळे खूश झाले. एक तर बडवे बाईंचे संस्कार आणि मुळात हा शब्दही अनेकजणांनी खूप दिवसांनी ऐकला ना! समारंभाचा सगळा खर्च माजी विद्यार्थ्यांनी केला. खूप पदार्थ होते जेवणात. पण मेन मेन्यू काय माहीत आहे? चपाती आणि भाजी आणि वाढायला चक्क बडवे बाई... सगळे ताट पुसून खाल्ले माजी विद्यार्थ्यांनी.


- रेशम जयंत झारापकर

मडगाव, गोवा.