भक्तांनो… नका माझा अंत पाहू!

गणपतीची मूर्ती लहान असो की मोठी मनापासून केलेली पूजा त्या बाप्पापर्यंत पोहोचते. स्पर्धा म्हणून किंवा मोठेपणा गाजवण्यासाठी पीओपीची मोठी मूर्ती आणून त्या गणपतीची अशी वाईट परिस्थिती करू नका.

Story: ललित |
08th August, 10:17 pm
भक्तांनो… नका माझा अंत पाहू!

आज आपल्याला प्रत्येक गोष्ट काही परिश्रम, कष्ट न घेता झालेली आवडते. आज प्रत्येक गोष्टींमध्ये स्पर्धा होऊ लागल्यात. जो - तो आपण सर्वात श्रीमंत आहोत हे दाखवत आहे. पण आपल्याला हे कळून चुकत आहे की, ही श्रीमंती असून काही उपयोग नाही. जर आपल्यात माणुसकी शिल्लक नसेल तर. आज स्पर्धा सगळीकडे दिसते, मातीची घरं कुणाला नकोत. एवढेच नाही तर प्रत्येक गोष्ट कष्ट न करता, जीवाची हालचाल न करता झालेली हवी असते. आपल्या पूर्वजांनी केलेले रीतीरिवाज किंवा आपली परंपरा, संस्कृती ही फक्त मजा म्हणून त्याचं पालन करत नाही. तर प्रत्येक सण हा मनुष्यला व निसर्गाला कोणतीच हानी पोहचवणार नाही या गोष्टीचा विचार करून प्रत्येक सणांची रचना केलेली आहे. पण आज आपण स्वतः स्वतःला त्रास करून घेतो त्याचबरोबर निसर्गालासुद्धा असंख्य प्रमाणात हानी पोहोचवतो. 

वर्षभर ज्या सणाची आपण आतुरतेने वाट बघत असतो तो सण म्हणजे गणेश चतुर्थी. त्या बाप्पासाठी बांधलेली माटोळी व पाच दिवस केलेला नैवेद्य या सगळ्या गोष्टी निसर्गाशी निगडित आहे. पाच दिवस देवाला केलेला नैवेद्य व त्यामध्ये केलेल्या भाज्या, या आरोग्यासाठी किती महत्त्वाच्या व पौष्टिक आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तो नैवेद्य दाखवण्यासाठी वापरलेले केळीचे पान व पाचही दिवस त्या केळीच्या पानावर जेवण करणे. भाजीपाल्याचे जेवण, त्यात कुठेतरी माणसाच्या आरोग्याचा त्याचप्रमाणे निसर्गाचा विचार करूनच या गोष्टीची निर्मिती झालेली दिसून येते. साडू मातीने तयार केलेला गणपती निसर्गाला आपलंसं करून घेतो. थोडा वेगळा विचार आपण केला तर असासुद्धा अर्थ काढता येतो की, ज्याप्रमाणे पूर्वी पूर्णपणे शेतीभाती करून जीवन जगत होतो. त्या मातीतून उगवलेले धान्य माणसाला जगण्याची आशा दाखवत होते व ते जीवन जगण्याचं एकमेव साधन होते. त्याच मातीतून तयार केलेली बाप्पाची मूर्ती व त्या मूर्तीची पूजा करणे म्हणजेच कुठेतरी असे आपण म्हणू शकतो की, जी माती आपल्याला एवढं काही देत आहे त्याची थोड्याप्रमाणात का होईना परतफेड म्हणून त्या साडू मातीपासून साकारलेली गणपतीच्या मूर्तीची पूजा करणे.

आज मातीचा गणपती उचलायला आपल्याला जड वाटतो म्हणून आपण पीओपीचा (Plaster of Paris) गणपती घरात आणतो. त्याची पाच - सात तर कोणी अकरा दिवस पूजा करतात. ते पाच दिवस आपण थाटामाटात घालवतो. घर सजवतो, भरपूर खर्च करतो कोणताही विचार न करता, मनापासून. एवढेच नाही तर, शेवटच्या दिवशी पूर्वीसारखं भजन म्हणत त्याला निरोप न देता, डीजे आणून वाजत गाजत त्याला आपण निरोप देतो. निरोप देत असताना आपण म्हणतो की -

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!

हा पीओपीचा गणपती आपल्या घरी तरी पोहचतो का, पुढच्या वर्षी लवकर यायला?  पीओपीचा गणपती कुठेतरी वाहत समुद्रकिनारी नाहीतर कुठल्यातरी ओहळात तसाच पडलेला असतो कित्येक दिवस. जिथे पडून असतो तेथील आजूबाजूची परिस्थिती बघितली तर, खरंच डोळ्यात पाणी येईल अशी असते. काही गणपती कचऱ्यांमध्ये तर काही गणपती दूषित पाणी सोडलं जातं त्या पाण्यात आपल्याला पाहायला मिळतात.

पीओपीने तयार केलेली गणपतीची मूर्ती सहज पाण्यात विरघळत नाही. तर ती कित्येक दिवस तशीच राहते. तर साडू मातीने तयार केलेली मूर्ती पाण्यात सहज विरघळते व निसर्गाला कोणताही त्रास देत नाही. समजा आपला बाप्पा सुरक्षित किंवा आनंदाने त्याला आपण निरोप दिलाच नाही तर, तो पुढच्या वर्षी आनंदाने कसा आपल्या घरी येणार? ज्या मूर्तीची आपण पाच दिवस मनापासून पूजा करतो, त्याची आतुरतेने वाट बघतो, त्याला आपण शेवटी चांगल्या पद्धतीने निरोप देतच नाही. त्या गणपतीची अशी वाईट परिस्थिती होत असेल तर त्याची पूजा करून आपण कसं काय पुण्य मिळवू शकतो. तो गणपती का म्हणून आपल्यावरील वाईट प्रसंग टाळू शकेल.

गणपतीची मूर्ती लहान असो की मोठी मनापासून केलेली पूजा त्या बाप्पापर्यंत पोहोचते. स्पर्धा म्हणून किंवा मोठेपणा गाजवण्यासाठी पीओपीची मोठी मूर्ती आणून त्या गणपतीची अशी वाईट परिस्थिती करू नका. साडू मातीची लहान मूर्ती आणून मनापासून पूजा करून आनंदाने निरोप द्या त्या बाप्पाला.


- हर्षदा सावंत

सावंतवाडा, मांद्रे.