बंध राखीचा, पण संदेश सन्मानाचा...

आजच्या काळात बंध हा रक्षणाचा नसून सन्मानाचा असला पाहिजे कारण आज प्रत्येक गोष्टीनुरुप समाज बदलत आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने स्त्रीचा सन्मान केला, तर खऱ्या अर्थाने त्या सन्मानातून तिचे रक्षण होऊ शकते.

Story: विशेष |
08th August, 10:14 pm
बंध राखीचा, पण संदेश सन्मानाचा...

ती राखी बांधते भाऊराया, जो रक्षण करीतो तिचे,

राखीच्या बंधातून प्रफुल्लित होते भावा - बहिणीचे अतूट नाते.

अशा ओळी मुखातून बाहेर पडतात जेव्हा रक्षाबंधनाचा सण जवळ येतो. भावा - बहिणीचे प्रेमळ नाते या सणाच्या आनंदात जोडलेले असते. एकमेकांबरोबर भांडणारी व खोडकर अशी भावंडे या दिवशी आनंदात असतात. बहीण भावाला राखी बांधते, भावाच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ बहिणीला भेट देतो तिच्या रक्षणाचे आश्वासन देत आनंदाने व मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन साजरी केली जाते. 

परंतु आज समाजात खरोखर मुलींचे रक्षण केले जात आहे का? प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते पण खरोखरच सन्मानाच्या आणि रक्षणाच्या हेतुने समाजातील मुले एका मुलीकडे पाहत असतात का? कदाचित या प्रश्नावर समाजातील लोकांनी विचार करणे गरजेचे आहे कारण आपण रक्षाबंधन साजरी करत असतो पण समाजातील स्त्रियांचे रक्षण करणे ही गोष्ट मात्र हरवत चाललेली आहे. अर्थातच,‌ आज प्रत्येक मुलीचे आणि स्त्रीचे स्थान असुरक्षिततेने भरलेले आहे.

राखी असते रक्षणाचे, सुरक्षेचे प्रतीक 

खरंच... केवळ एका दिवसासाठी मुलींची रक्षा करणे असा विचार रक्षाबंधन या सणातून व्यक्त होत नाही. कारण राखी बांधताना आयुष्यभरासाठी बहिणीला वचन दिले जाते मग ते अर्धवट कसे ठेवले जाते? प्रत्येक मुलगी भावाला राखी बांधते, भावाच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते पण आज समाजातील लोकांचे विचार बदलले आहेत आणि म्हणूनच मुलींचा सन्मान करण्याऐवजी आज तिचा अपमान केला जात आहे. प्रत्येक मुलीला बळ देण्यासाठी, तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिला जो आधार हवा असतो तो मिळत नाही. म्हणूनच प्रश्न उभा राहतो की रक्षाबंधन फक्त एकाच दिवसासाठी असावे की आयुष्यभरासाठी? समाजातील प्रत्येक व्यक्तीने जर या गोष्टीचा विचार केला, समाजातील मुलींचा बहिणीप्रमाणे आदर केला तर अवश्य रक्षाबंधन खऱ्या अर्थाने साजरी होऊ शकेल.

प्रत्येक स्त्री, मग ती बहीण असो, आई असो, सहकारी असो किंवा अपरिचित, तिला समान आदर मिळायला हवा. तिच्या सन्मानासाठी उभे राहणे, तिच्या स्वप्नांना हातभार लावणे आणि तिच्या सुरक्षिततेबद्दल सजग राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जेव्हा संपूर्ण समाज स्त्रीला बहिणीप्रमाणे मान देईल, तेव्हाच रक्षाबंधनाचा संदेश खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोहचेल.

प्रत्येक वर्षी येणारा रक्षाबंधनाचा सण हा एका दिवसासाठी साजरा न करता दररोज साजरा होणे गरजेचे आहे. तसेच आजच्या काळात बंध हा रक्षणाचा नसून सन्मानाचा असला पाहिजे कारण आज प्रत्येक गोष्टीनुरुप समाज बदलत आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने स्त्रीचा सन्मान केला, तर खऱ्या अर्थाने त्या सन्मानातून तिचे रक्षण होऊ शकते. तेव्हा तिला सुरक्षित वातावरण मिळू शकते. केवळ धोक्यात असताना बहिणीचे रक्षण करणे पुरेसे नाही, तर तिला असा आत्मविश्वास देणे गरजेचे आहे की ती स्वतःच्या अधिकारांसाठी लढू शकेल. 

म्हणूनच जगातील सर्व भाऊरायांना एकच संदेश,

राख तू तिचा सन्मान,

कर तू तिचे रक्षण,

भाऊराया तुझ्या मायेने व प्रेमाने कर तू प्रत्येक बहिणीचा आदर.


- पूजा भिवा परब

पालये-पेडणे