आपली पायवाट, पण कुणाच्या पावलांनी?

आपण जे आहोत आणि जे व्हावंसं वाटतं यामधला फरक सतत टोचत राहतो. ही खंत वाढत गेली, की आत्ममूल्य कमी होतं आणि अनेक रिकामी, चिवट, गोंधळलेली व्यक्तिमत्त्वं तयार होतात.

Story: मनी मानसी |
08th August, 10:11 pm
आपली पायवाट, पण कुणाच्या पावलांनी?

“त्या सुनेनं जरा तिच्या जावेकडे पाहून शिकावं...”

“आमच्या मुलानं पण तसंच काहीतरी करावं...”

“तुम्ही अजून युरोप टूर केली नाही?!”

अहो, हे वाक्ये कुठल्याही एका वयोगटात बसवा. अगदी पाळण्यातल्या बाळापासून ते वृद्धाश्रमातल्या आजोबांपर्यंत, कुणालाही लागू होतीलच! नाही का? 

बरं, लहानपणी एक साधा खेळ असे, लपाछपीचा. डोळे झाकायचे आणि दुसऱ्यांना शोधायचं. पण आजच्या आयुष्यात डोळे उघडे असतानाही आपण सतत कोणालातरी शोधतोय! कोण कसं जगतंय, काय खातंय, कुठं फिरतंय, किती कमवतंय आणि मग त्यांच्यासारखं आपल्याला ही व्हायचं. हेच ते अनुकरण. ही ती तुलना आणि हेच ते बरोबरीचं सतत धावणं.

आता हे अनुकरण सुरुवातीला निरुपद्रवी वाटतं. म्हणजे एखाद्या यशस्वी व्यक्तीकडून प्रेरणा घेणं हे एक वेळ ठीक. पण जेव्हा हे अनुकरण सततचं होतं, तेव्हा ते स्वत्व गिळायला सुरुवात करतं. कारण, प्रत्येकानं एकच रेस सुरू केलीये. त्यात आपण का पळतोय, कुठं पोहोचायचंय, हे मात्र कुणालाच ठाऊक नाही.

बालपणीची अनुकरणाची सुरुवात साधीसुधी असते. “तिच्या सारखीच बॅग पाहिजे”, “त्याच्या सारखंच बोलायचंय”, हे निरागस वाटतं. पण हीच बरोबरी जसजसं वय वाढतं, तसतशी गंभीर होते. किशोरवयीन मुलांनी कोणत्या काॅलेजमध्ये अॅडमिशन घेतलं, ते कपडे कोणत्या ब्रॅण्डचे घालतात, हे सगळं identity चा भाग बनतं. आणि मोठेपणी तर थेट तुलनांचा बाजारच भरवला जातो! कोणाचं लग्न कसं लॅविश, कोणाच्या मुलांना कोणत्या देशात स्कॉलरशिप, अगदी रिटायर झाल्यावरसुद्धा “त्यांनी दुबई सहल केली”, हे कानावर आलं तरी मन थोडं हेलावून जातंच. 

मनोविश्लेषणाच्या दृष्टिकोनातून बघितलं, तर हे सततचं अनुकरण व तुलना ‘ईगो’ आणि ‘आयडियल सेल्फ’ यामधली दरी अधिक वाढवतं. अर्थात आपण जे आहोत आणि जे व्हावंसं वाटतं यामधला फरक सतत टोचत राहतो. ही खंत वाढत गेली, की आत्ममूल्य कमी होतं आणि अनेक रिकामी, चिवट, गोंधळलेली व्यक्तिमत्त्वं तयार होतात.

पण, अनुकरण करणं काही फारच वाईट नव्हे! कुणाचं चांगलं वागणं, विचार, जीवनशैली यातून प्रेरणा घेणं हे केव्हाही उत्तमच. परंतु ते स्वतःच्या शैलीत साजरं करणं हे योग्य. Blind Comparison अर्थात आंधळी तुलना आणि Blind Imitation अर्थात आंधळं अनुकरण करणे हीच खरी आजची मानसिक घसरण होय कारण हे अनुकरण जेव्हा आपल्या गरजा, पार्श्वभूमी, क्षमतेला पूर्णपणे नाकारतं, तेव्हा ते आपल्याच विनाशाचं कारण ठरतं.

आज बऱ्याच केसेसबाबतीत, anxiety आणि डिप्रेशनच्या मुळाशी तुलना आणि त्यातून होणारे अनुकरण आहे. आणि हे इतकं अवचित घडत असतं की आपल्याला चटकन लक्षात येत ही नाही. त्यात सोशल मीडियानं ही तुलना जरा जास्तच उघड्यावर आणली आहे. माझी आजी म्हणायची पूर्वीच्या काळी कोणी काय केलंय हे फक्त लग्नात कळायचं. परंतु आता मात्र कोण काय करतं ते ह्या मोबाईलमुळे रोजच समोर येतं!

म्हणजे, आधी इतरांसारखं होण्याचा दबाव वार्षिक असे, आता तो क्षणाक्षणाला आहे. आणि म्हणूनच या तुलना, बरोबरी आणि अनुकरणाच्या लाटेत माणसं इतकी भांबावली आहेत की स्वतःला जपायचं विसरली आहेत.

असं वाटतं, की आयुष्य म्हणजे एक जीवघेणी शर्यत झाली आहे पण फिनिश लाईन ठरलेलीच नाही. प्रत्येकजण पुढे जाण्याच्या नादात आहे, पण कुठे, का, याचा विचार होत नाही.

फ्राॅईड म्हणतो, माणसाच्या वागणुकीला एक अपरिपक्व “Id” असतं, सतत इतरांशी बरोबरी करणारे, त्वरित सुख हवे असणारे. तर दुसरीकडे, एरिकसन म्हणतो की आयुष्याच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर आपली स्वतःची ओळख तयार करणं आवश्यक असतं.

पण जर स्वतःच्या प्रत्येक developmental stage वर माणूस सतत कोणा दुसऱ्यासारखं होण्यासाठी धडपडत असेल, तर त्याच्या स्वत्वाच्या शोधाला नेमकी दिशा कशी सापडणार?

त्यामुळे विचार करा.. तुलना करताना आपण आपल्या आनंदाचा गळा घोटतो का? बरोबरीच्या नादात आपण आपल्या मूळ व्यक्तिमत्त्वालाच पारखे होतोय का?

उत्तरं सहज मिळणार नाहीत. पण प्रश्न विचारणं हे सध्या गरजेचं आहे.


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४