आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे केवळ उत्पादन वाढत नाही, तर जमिनीची गुणवत्ता राखली जाते, पाण्याचा आणि खतांचा अपव्यय टळतो आणि पर्यावरणावर होणारा परिणाम कमी होतो. त्यामुळे अशा शाश्वत आणि अचूक शेतीच्या पद्धती भविष्यातील शेतीचे भविष्य ठरवणार आहेत.
शेती ही आपली पारंपरिक उपजीविका असून ती पर्यावरण, हवामान आणि माणसाच्या कष्टांवर अवलंबून आहे. मात्र, सध्याच्या काळात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, जसे की हवामानातील अनिश्चितता, पावसाची कमतरता किंवा अतिरेकी प्रमाण, जमिनीतील सुपीकतेत घट, कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव, मजुरांचा तुटवडा आणि उत्पादन खर्चात वाढ. या समस्यांवर उपाय म्हणून शाश्वत आणि अचूक शेती ही एक नवी संकल्पना पुढे आली आहे. या शेतीत वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक चांगले उत्पादन मिळवून देणे, त्यांचा खर्च कमी करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यावर भर दिला जातो.
२०२५ साली संजीत कुमार बोरा, दिव्यारूपा पाल, सुदीप्तो सरकार आणि लक्ष्मीनारायण सेठी यांनी त्यांच्या संशोधनात असे नमूद केले आहे की, मानवरहित उड्डाण यंत्रे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या साहाय्याने शेतातील कामे अधिक सोपी, जलद आणि परिणामकारक बनवता येतात. या यंत्रांमुळे शेतजमिनीचे छायाचित्रण करून त्यातील आद्रतेची पातळी, झाडांची वाढ, आजाराची लक्षणे इत्यादी गोष्टी सहज समजतात. या माहितीच्या आधारे संगणकीय विश्लेषण करून शेतकऱ्यांना योग्य सल्ला दिला जातो, जसे की पाणी कोठे द्यायचे, खत किती टाकायचे आणि कीटकनाशकाची गरज आहे की नाही इत्यादी. यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो, खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढते.
दुसरे एक महत्त्वाचे संशोधन अली मानेद, सलमा मौअतस्सीम, मौनिया अल हाजी आणि जमाल बेंहरा यांनी २०२५ मध्ये केले असून त्यात त्यांनी जगभरातील ७५ हून अधिक संशोधनांचा आढावा घेतला आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, या तंत्रांचा वापर केल्याने शेतकऱ्यांना वेळेवर रोग ओळखता येतो, खताचा अचूक वापर करता येतो आणि उत्पादनात सरासरी पाच ते दहा टक्के वाढ होते. महत्त्वाचे म्हणजे ही यंत्रे एकाच वेळी अनेक एकरांवर काम करू शकतात, त्यामुळे मोठ्या भागांची कमी वेळेत निगा राखता येते. काही राज्यांमध्ये ही यंत्रे सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना भाड्याने दिली जातात, ज्यामुळे लहान शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळतो. २०२४ मध्ये या तंत्रज्ञानाचे बाजारमूल्य २. ७४ अब्ज रुपयांवर पोहोचले होते आणि अंदाजे २०३० पर्यंत तो दहा अब्जांवर जाईल, असे सांगितले जात आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे केवळ उत्पादन वाढत नाही, तर जमिनीची गुणवत्ता राखली जाते, पाण्याचा आणि खतांचा अपव्यय टळतो आणि पर्यावरणावर होणारा परिणाम कमी होतो. त्यामुळे अशा शाश्वत आणि अचूक शेतीच्या पद्धती भविष्यातील शेतीचे भविष्य ठरवणार आहेत. शासन, संशोधक आणि शेतकरी जर एकत्रितपणे या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करू लागले तर शेती एक नफा मिळवून देणारा आणि पर्यावरणपूरक व्यवसाय बनेल यात शंका नाही.
- डॉ. सुजाता दाबोळकर