गर्भनिरोधक गोळ्या: फायदे आणि जोखीम

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांना गर्भधारणेवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे. मात्र, त्यांचे दीर्घकाळ सेवन केल्यास शरीरावर अनेक सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. या लेखात आपण गोळ्यांचे फायदे, तोटे आणि प्रत्येक स्त्रीने घ्यायची काळजी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Story: आरोग्य |
08th August, 10:01 pm
गर्भनिरोधक गोळ्या: फायदे आणि जोखीम

सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेली अक्षता, एक हुशार, करिअर-ओरिएंटेड तरुणी. ती एका नामांकित कंपनीत नोकरी करत होती व तिला आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित ठेवायचे होते. पण त्याचसोबत आपल्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण हवे होते, म्हणूनच तिने गर्भनिरोधक गोळ्या घेणे सुरू केले. तिला पहिल्या काही महिन्यांत सगळे सुरळीत वाटले. पाळी नियमित झाली आणि ती अधिक आत्मविश्वासाने आयुष्य जगू लागली. पण हळूहळू काही सूक्ष्म बदल जाणवू लागले, जसे मूड स्विंग्स, वजन वाढ आणि थकवाही वाढू लागला. डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली असता डॉक्टर म्हणाले, "अक्षता, गर्भनिरोधक गोळ्या सुरक्षित असल्या तरी दीर्घकाळ घेतल्यास काही स्त्रियांना साइड इफेक्ट्स होऊ शकतात, जसे हार्मोनल बदल, हाडांची घनता कमी होणे किंवा रक्तदाब वाढणे. यासाठी दर ६ महिन्यांनी तपासणी आवश्यक असते."

अक्षताला जाणवले की आरोग्याच्या बाबतीत 'सोयीसाठी' घेतलेले निर्णय दीर्घकाळात शरीरावर परिणाम करू शकतात. ती डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार गोळ्या बंद करून आय.यु.डी., नैसर्गिक पद्धती किंवा बॅरिअर पद्धती यासारख्या दुसऱ्या पर्यायांचा विचार करू लागली.

गर्भनिरोधक गोळ्या सुरक्षित असल्या तरी प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असते व वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे त्यांचा प्रत्येकीवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. या गर्भनिरोधक गोळ्यांचा शरीरावर व आपल्या एकूण दीर्घकालीन आरोग्यावर कसा प्रभाव पडू शकतो हे आपण आज विस्तारात जाणून घेऊ.

भारतात गर्भधारणा रोखण्यासाठी १३९ दशलक्षाहून अधिक महिला आधुनिक गर्भनिरोधक पद्धतींचा अवलंब करतात. गर्भनिरोधक गोळ्या ही हार्मोनल गर्भनिरोधकाची एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे, ज्यामध्ये फक्त ०.१% महिलांना अनपेक्षित गर्भधारणा होण्याची शक्यता असते. गोळ्यांमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचे कृत्रिम स्वरूप असते, जे नैसर्गिकरित्या अंडाशयात तयार होतात. गर्भनिरोधक गोळ्या अंडाशयांना दरमहा अंडी सोडण्यापासून रोखतात (ओव्हुलेशन), शुक्राणूंना आत जाण्यापासून रोखण्यासाठी श्लेष्मा जाड करतात किंवा गर्भाशयाच्या भिंतीला पातळ करतात, ज्यामुळे अंडी गर्भाशयात रोपण होत नाहीत व गर्भधारणेला प्रतिबंध होतो. अल्पकालीन वापरासाठी या गोळ्या सुरक्षित मानल्या जात असल्या तरी सतत वापराने यांचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, ज्याची महिलांनी जाणीव ठेवली पाहिजे.

गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापराचे संभाव्य फायदे

 मासिक पाळी नियमित होणे: गर्भनिरोधक गोळ्या मासिक पाळी नियमित करतात, पाळीचा रक्तस्राव कमी करतात व त्यामुळे अ‍ॅनिमियाचा धोका कमी होतो.

 ओव्हरी व गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होणे: संशोधनानुसार, गर्भनिरोधक गोळ्यांचा दीर्घ वापर केल्यास ओव्हरी व गर्भाशयाच्या आतील अस्तराचा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

 अंडाशयाच्या सिस्ट्सपासून संरक्षण: पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम व हार्मोनल असंतुलनाच्या बाबतीत काही महिलांमध्ये या गोळ्यांचा फायदा होतो.

 पिंपल्स व त्वचेच्या तक्रारी कमी होणे: हार्मोनल संतुलन सुधारल्यामुळे स्त्रियांच्या त्वचेच्या समस्या कमी होतात.

दीर्घकालीन वापराचे संभाव्य तोटे व जोखीम

  रक्ताच्या गाठी: आधीपासून इतर हृदयरोगाचे जोखमीचे घटक असलेल्या स्त्रियांमध्ये एस्ट्रोजेनमुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका थोडा वाढतो.

  रक्तदाब वाढणे: गर्भनिरोधक गोळ्यांच्या दीर्घ वापरामुळे काही महिलांमध्ये उच्च रक्तदाब निर्माण होऊ शकतो.

  स्तनाचा कर्करोग: काही अभ्यासानुसार दीर्घकाळ वापर केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका थोड्या प्रमाणात वाढू शकतो.

  हाडांच्या घनतेवर परिणाम: फक्त प्रोजेस्टेरॉन गोळ्यांचा दीर्घकालीन वापर केल्यास, काही महिलांमध्ये हाडांची घनता कमी होण्याचा धोका असतो. विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये किंवा रजोनिवृत्तीनंतर वापरल्यास हाडे कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे वृद्धावस्थेत हाड तुटण्याचा धोका वाढू शकतो.

  मानसिक स्वास्थ्यावर परिणाम: हार्मोनल असंतुलनामुळे मेंदूतील सेरोटोनिन, डोपामिन यासारख्या न्यूरोट्रान्समीटरवर परिणाम होतो. यामुळे काही महिलांना मूड स्विंग्स, नैराश्य किंवा चिडचिड यांचा अनुभव येतो.

  प्रजनन क्षमतेवर तात्पुरता परिणाम: गोळ्या बंद केल्यानंतर काही महिलांना लगेच गर्भधारणा होण्यास वेळ लागू शकतो, मात्र दीर्घकालीन परिणाम मात्र होताना दिसत नाही.

  त्वचा व केसांवर परिणाम: काही महिलांमध्ये सकारात्मक परिणाम दिसला तरी काही जणींमध्ये प्रोजेस्टेरॉन घटक केस गळती किंवा हायपरपिगमेंटेशन वाढवू शकतात.

गर्भनिरोधक गोळ्या सुरू करण्यापूर्वी वैयक्तिक, कौटुंबिक, वैद्यकीय इतिहास जाणून घेणे आवश्यक असते. मायग्रेन, हृदयविकाराचा इतिहास, लिव्हरचे आजार, धूम्रपान करणाऱ्या वयस्क महिला, कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास, ३५ वर्षांवरील महिला यांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या घेण्याआधी वैद्यकीय सल्ला अत्यावश्यक असतो. सतत गोळ्या घेत असल्यास, दर ६-१२ महिन्यांनी डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी. तसेच मानसिक आरोग्य, वजन, रक्तदाब व त्वचेतील बदल यावर निरीक्षण ठेवावे.

एक लक्षात ठेवावे की, गर्भनिरोधक गोळ्या महिलांसाठी जरी एक प्रभावी व सुरक्षित पर्याय असला तरी त्यांचा दीर्घकालीन वापर काही ठिकाणी लाभदायक तर काही ठिकाणी जोखमीचा ठरू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन वापर करताना महिलांनी स्वतःच्या शरीरातील लक्षणे ओळखून, डॉक्टरांचा नियमित सल्ला घेत राहावे. सर्व महिलांमध्ये एकसारखा परिणाम होत नाही, त्यामुळे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो.



- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर