अखेर लक्ष्मीने रक्षाबंधनाच्या सकाळी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण त्याच दिवशी भर दुपारी तिचा मृत्यू झाला. "ताई गं, का सोडून गेलीस मला? मला राखी कोण बांधणार? बाळाचा तरी विचार केला असतास!" असा हंबरडा तिचा भाऊ मोठमोठ्याने फोडत होता.
रक्षाबंधन आले की तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. रक्षाबंधनाच्या निमित्ताने खूप वर्षांपूर्वी घडलेली माझ्या गावातील एक घटना मी तुम्हाला सांगू इच्छिते. मी पाच वर्षांची असताना लक्ष्मीकाकी 'दूध पिशवी व चॉकलेट दे' म्हणायची. मी असे म्हणताच लक्ष्मीकाकी हसून माझ्या हातात सांगितलेले सामान ठेवायची. लक्ष्मी दिसायला गोरीपान, सुंदर, सोज्वळ, हसऱ्या चेहऱ्याची आणि मनमिळाऊ होती. ती राघू पुजाऱ्याची बायको होती. राघू, त्याचे म्हातारे आई-वडील आणि श्याम, त्यांचा पाच वर्षांचा मुलगा असा त्यांचा हसता-खेळता परिवार होता. राघू पुजाऱ्याचे काम करण्यात व्यस्त असल्यामुळे त्याच्यामागे त्याची लक्ष्मी घरचे दुकान सांभाळायची. श्याम लहान असल्यामुळे खूप उनाडक्या करायचा. "मी मेल्यावर तुला अक्कल येईल" असे ती रागात त्याला खूपदा म्हणत असे. असे अपशब्द वापरू नयेत असे तिची सासू तिला खूपदा सांगायची, पण घरकाम, देवळाची साफसफाई, दुकान सांभाळणे आणि श्यामला सांभाळणे यामुळे तिची खूप धावपळ होऊन चिडचिड होत होती. त्यात ती पुन्हा गरोदर राहिली. गावात पाण्याची टंचाई होती. सातव्या महिन्यातही ती चालत दोन किलोमीटर जाऊन विहिरीवरून पाणी आणत असे.
अखेर लक्ष्मीने रक्षाबंधनाच्या सकाळी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण त्याच दिवशी भर दुपारी तिचा मृत्यू झाला. "ताई गं, का सोडून गेलीस मला? मला राखी कोण बांधणार? बाळाचा तरी विचार केला असतास!" असा हंबरडा तिचा भाऊ मोठमोठ्याने फोडत होता. त्या दिवशी संपूर्ण गावात कोणीही चूल पेटवली नाही किंवा रक्षाबंधन साजरे केले नाही. सर्वांनी हळहळ व्यक्त केली. श्यामला उद्देशून वापरलेले ते शब्द जणू खरे ठरले होते. लक्ष्मीचा मृत्यू अंतर्गत रक्तस्रावामुळे (internal bleeding) झाला आणि ती ओली बाळंतीणच गेली. आईचा पाझर, माया, साऱ्याआकांक्षा अपूर्ण राहिल्या. लक्ष्मीचे अंत्यसंस्कार झाले. काही दिवस गेले, पण लोक त्या बाजूने जायला घाबरू लागले. रात्री लक्ष्मी रडताना दिसते, असे ऐकू येऊ लागले. देवळाच्या वाटेने रात्रीचे लोक जायला घाबरत
होते. गावात विचित्र आवाज येत होते. लक्ष्मीच्या शेजाऱ्यांना तर तिच्या सावल्या आणि रडण्याचा आवाजही ऐकू आला होता. संपूर्ण गावात नकारात्मक शक्ती संचारली होती. श्यामच्या वाढदिवसाच्या दिवशी तर हद्दच झाली. राघूच्या घराचे गेट मोठमोठ्याने वाजायला लागले. पण शेवटी ती आईची मायाच होती. पुजारी कुटुंबाकडून लक्ष्मीच्या आत्म्याच्या शांतीसाठी वेगवेगळे प्रयत्न चालू होते.
त्यातच गावात रात्रीच्या वेळी अस्वलासारखा (भालू) एक विचित्र प्राणी येतो आणि आवाज करतो अशा घटनाही घडू लागल्या. गावातील सगळे लोक घाबरले. त्याचा दोष ते राघू पुजारी कुटुंबालाच देऊ लागले. शेवटी राघू पुजाऱ्यांनी घराला कुलूप लावले आणि ते दुसरीकडे निघून गेले. गावकऱ्यांनी गावात सहस्त्र नामजप व होमहवन केले आणि गावातील नकारात्मक घटनांना पूर्णविराम मिळाला. पण आजही रक्षाबंधनाच्या दिवशी पुजाऱ्यांच्या घराच्या गेटचा आवाज येतो आणि कोणीही रक्षाबंधनाच्या दिवशी पुजाऱ्यांच्या घरापाशी फिरकत नाहीत.