जैस्वालची कसोटी रँकिंगमध्ये मोठी झेप

आयसीसी रॅकिंंग : सिराजची १२ स्थानांनी झेप

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
06th August, 11:59 pm
जैस्वालची कसोटी रँकिंगमध्ये मोठी झेप

दुबई : आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत मोहम्मद सिराजने कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंग मिळवले आहेत, त्याच्यासह प्रसिद्ध कृष्णानेही रेटिंगमध्ये सर्वाधिक गुणांची कमाई केली आहे. तसेच फलंदाजीत यशस्वी जैस्वाल पाचव्या स्थानी पाेहोचला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ९ बळी घेत भारताला विजय मिळवून देण्यासह, या संपूर्ण मालिकेत २३ बळी घेणारा सिराज आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा १५ व्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी सिराज २७ व्या स्थानी होता आणि आता त्याला १२ स्थानांचा फायदा झाला आहे. याआधी जानेवारी २०२४ मध्ये सिराज १६ व्या स्थानावर पोहोचला होता. याशिवाय, प्रसिद्ध कृष्णाने मालिकेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये भरपूर धावा दिल्या होत्या, परंतु शेवटच्या सामन्यात तोच खरा नायक म्हणून उदयास आला. याच उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याचे रेटिंग वाढून आता ३६८ झाले आहे. प्रसिद्ध कृष्णाने यावेळी तब्बल २५ स्थानांची झेप घेत थेट ५९ वे स्थान गाठले आहे. ही प्रसिद्धची देखील आतापर्यंतची सर्वोच्च क्रमवारी आहे.बुमराहचे सध्या ८८९ रेटिंग आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजांच्या रेटिंगमध्ये मोठे अंतर आहे. सध्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा असून, त्याचे रेटिंग ८५१ आहे. त्यामुळे बुमराहच्या अव्वल स्थानाला सध्या कोणताही धोका नाही.भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यानंतर आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या ताज्या क्रमवारीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट अव्वल स्थानी कायम आहे. त्याचे रेटिंग ९०८ अंकांवर पोहोचले आहे. भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत उत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्या हॅरी ब्रूकला (८६८) एका स्थानाची बढती मिळाली असून, तो तिसऱ्यावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा केन विल्यमसन (८५८) एका स्थानाने घसरून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (८१६) आपले चौथे स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.
यशस्वी जैस्वालची मोठी झेपमिचेलला फायदा, गिल टॉप १० मधून बाहेर
इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालला त्याच्या कामगिरीचा फायदा ताज्या क्रमवारीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने तीन स्थानांची झेप घेत पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावर आपले स्थान पक्के केले आहे. त्याचे रेटिंग ७९२ पर्यंत वाढले आहे. जैस्वालच्या या प्रगतीमुळे टेंबा बावुमा, कामिंदू मेंडिस आणि ऋषभ पंत यांना प्रत्येकी एका स्थानाचे नुकसान झाले आहे. बावुमा (७९०) सहाव्या, मेंडिस (७८१) सातव्या, तर पंत (७६८) आठव्या क्रमांकावर घसरले आहेत.
न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने या क्रमवारीत एकाच वेळी चार स्थानांची प्रगती केली आहे. तो आता ७४८ रेटिंगसह नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडचा बेन डकेट (७४७) दहाव्या स्थानी कायम आहे. तथापि, या क्रमवारीतील सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल म्हणजे भारताचा कसोटी कर्णधार आणि प्रतिभावान फलंदाज शुभमन गिल अव्वल दहा फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडला आहे. चार स्थानांच्या मोठ्या घसरणीसह तो थेट १३व्या क्रमांकावर आला आहे. सध्या त्याचे रेटिंग ७२५ आहे.
शुभमन गिलला ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नामांकन
भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिलला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. त्याच्या सोबत इंग्लंडचे अष्टपैलू बेन् स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा व्हियान मुल्डर यांचेही नामांकन झाले आहे. गिलने इंग्लंड दौर्‍यातील तीन कसोटी सामन्यांत ९४.५० च्या सरासरीने ६५७ धावा फटकावल्या होत्या.