टेबल टेनिस स्पर्धा : इशिता, आयुषी, गियाना, आर्ना उपांत्य फेरीत
फातोर्डा : येथील मल्टिपर्पज स्टेडियमवर सुरू असलेल्या ३७ व्या व्ही.एम. साळगावकर अखिल गोवा मेजर मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या ११ वर्षांखालील मुलांच्या गटात ईशान कुलासो आणि अशांक दळवी यांनी अंतिम फेरी गाठली आहे. गोवा टेबल टेनिस असोसिएशनच्या सहकार्याने कुठ्ठाळी जिमखानाने या स्पर्धेचे आयोजन केेले आहे.
अव्वल मानांकित ईशानने उपांत्यपूर्व फेरीत क्लॅडविन मिरांडाला ३-० असे पराभूत करून स्पर्धेत शानदार फॉर्म दाखवला. त्यानंतर उपांत्य फेरीच्या सामन्यात वर्धन वेर्लेकरला ३-० असे पराभूत करत त्याने सहज अंतिम फेरीत प्रवेश केला. अशांक दळवीनेही उपांत्यपूर्व फेरीत विवाहन सस्मलला ३-० ने हरवले आणि दुसऱ्या उपांत्य सामन्यात केदार नायरचा ३-१ ने पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
१५ वर्षांखालील मुलींच्या गटात चारही उपांत्य फेरीतील खेळाडूंची नावे निश्चित झाली आहेत. इशिता कुलासोने तिशा शेखचा ३-० ने पराभव केला, तर आयुषी आमोणकरने साची देसाईला ३-० ने हरवून आपले वर्चस्व कायम राखले. गियाना जॉर्जने काव्या खलपला ३-० ने हरवत आपला विजयी धडाका सुरू ठेवला. तर आर्ना लोटलीकर हिने ईरा नाडकर्णीला ३-२ अशी मात देत कडव्या लढतीत विजय मिळवला.