भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांचे वर्चस्व, सात पदके निश्चित

आशियाई बॉक्सिंग : यशिका, निशा, मुस्कान, विनी, आकांक्षा आणि आरती उपांत्य फेरीत

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
05th August, 11:53 pm
भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांचे वर्चस्व, सात पदके निश्चित

बँकॉक : भारताच्या महिला मुष्टियोद्ध्यांनी अंडर-१९ आणि अंडर-२२ आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आतापर्यंत सात पदके निश्चित केली आहेत. अंडर-१९ गटात सात महिला मुष्टियोद्ध्यांनी आपापल्या वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
पदके निश्चित करणाऱ्या खेळाडूंमध्ये यशिका (५१ किलो), निशा (५४ किलो), मुस्कान (५७ किलो), विनी (६० किलो), निशा (६५ किलो), आकांक्षा (७० किलो) आणि आरती कुमारी (७५ किलो) यांचा समावेश आहे. या स्पर्धेतील त्यांची दमदार कामगिरी पाहता भारत अंडर-२२ गटातही डझनाहून अधिक पदके मिळवण्याच्या मार्गावर आहे.भारताच्या खेळाडूंचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास:
यशिका (५१ किलो) : तिने उझबेकिस्तानच्या मुख्तसर अलीवाला ३-२ अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
निशा (५४ किलो) : निशाने किर्गिस्तानच्या मिलाना शिखशाबेकोवाला 'रेफ्री स्टॉप्स कॉन्टेस्ट' (आरएससी) च्या आधारावर नमवत उपांत्य फेरी गाठली.
मुस्कान (५७ किलो) : मुस्कानने उझबेकिस्तानच्या रुबिया रवशानोवाचा सहज पराभव केला.
विनी (६० किलो) : विनीने किर्गिस्तानच्या अडेलिया किझीला 'रेफ्री स्टॉप्स कॉन्टेस्ट' (आरएससी) च्या आधारावर मात दिली.
निशा (६५ किलो): निशाने चायनीज तैपेईच्या यू एन लिचा तीन फेऱ्यांमध्ये पराभव केला.
आकांक्षा (७० किलो) : आकांक्षाने मंगोलियाच्या एनखगेरेल गेरेलमंखला पहिल्याच फेरीत 'रेफ्री स्टॉप्स कॉन्टेस्ट' (आरएससी) च्या आधारावर हरवले.
आरती कुमारी (७५ किलो) : आरतीने कझाकस्तानच्या जरीना टीचा ४-१ अशा फरकाने पराभव करत आपले पदक निश्चित केले.
दरम्यान, ४८ किलो वजनी गटात भारताची सुमन कुमारी हिला उझबेकिस्तानच्या मफ्तुना मुसुरमोनोवाकडून ३-२ असा पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांच्या या कामगिरीमुळे स्पर्धेतील भारताचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.

शिवम, मौसम सुहागची विजयी सुरुवात
थायलंडमधील बँकॉक येथे सुरू असलेल्या अंडर-१९ आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या शिवम आणि मौसम सुहाग यांनी आपापल्या वजनी गटात प्रतिस्पर्धकांना पराभूत करत विजयी सुरुवात केली आहे.
पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात, शिवमने तुर्कमेनिस्तानच्या बेजिरगेन अनायेववर एकतर्फी विजय मिळवला. त्याने तिन्ही फेऱ्यांमध्ये वर्चस्व राखत पंचांच्या सर्वसंमतीने हा सामना जिंकला. यानंतर, ६५ किलो वजनी गटात झालेल्या अटीतटीच्या लढतीत मौसम सुहागने कझाकस्तानच्या नूरकाबीलुली मुखितला ३-२ अशा फरकाने पराभूत केले. मौसमचा हा विजय अत्यंत संघर्षपूर्ण होता. मात्र, ६० किलो वजनी गटात भारताच्या शुभम कुमारला कझाकस्तानच्या तोर्तुबेक आदिलेतविरुद्ध ०-५ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. शिवम आणि मौसम यांच्या विजयामुळे भारतीय संघाच्या पदकांच्या आशा वाढल्या आहेत.