चार सुवर्णपदक, एक रौप्यपदकासह लक्षवेधी कामगिरी
गोवा युवा क्रीडा संघ आयोजित चार तालुक्यांच्या पहिल्या महिला वेट लिफ्टिंग स्पर्धेत उपविजेता ठरलेला पेडणे तालुका महिला संघ.
पेडणे : म्हापसा-पेडे येथे आयोजित केलेल्या गोवा क्रीडा असोसिएशन पुरस्कृत गोवा युवा क्रीडा संघ आयोजित ४ तालुक्यांच्या झालेल्या पहिल्या महिला वेट लिफ्टिंग स्पर्धेत पेडणे तालुका महिला संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत पेडणे तालुका महिला संघाने ४ सुवर्णपदक व एक रौप्यपदक पटकावले.
पेडणे महिला संघ नेनिस डिप्लोमा यांच्या नेतृत्वाखाली वेट लिफ्टिंग स्पर्धेत सहभागी झाला होता. या संघाला प्रशिक्षक महेश कवळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत सत्तरी, बार्देश, पेडणे आणि डिचोली असे चार तालुक्यांतील मिळून ६३ स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन हळदोणा मतदारसंघाचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा व शिवोली मतदारसंघाचे आमदार डिलायला लोबो यांच्या हस्ते झाले. त्यांच्या सोबत गोवा वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या अध्यक्ष प्रियंका जयेश नाईक, गोवा युवा क्रीडा संघाच्या अध्यक्ष क्रितिका गोलतेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक अँड्र्यू गोमस, दयानंद हरमलकर, तनोज किनळेकर व महेश कवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.