दुखापतीनंतरही पंतचे झुंजार अर्धशतक

भारत सर्वबाद ३५८ : बेन स्टोकचे ५ बळी; इंग्लंड २ बाद २२५

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
25th July, 12:25 am
दुखापतीनंतरही पंतचे झुंजार अर्धशतक

मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर संपला. सलामीवीर यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, उपकर्णधार ऋषभ पंत यांच्या अर्धशतकांमुळे भारताने समाधानकारक धावसंख्या उभारली. दुखापतीनंतर मैदानात परतलेल्या पंतने दाखवलेला संयम आणि शार्दूल ठाकुरने केलेली चिवट खेळी ही दिवसाची वैशिष्ट्ये ठरली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने अप्रतिम फलंदाजी करत भारताच्या पहिल्या डावाला चोख उत्तर दिले. दिवसअखेर इंग्लंडने ४६ षटकांत केवळ २ गडी गमावून २२५ धावा केल्या असून अजूनही ते भारतापेक्षा १३३ धावांनी पिछाडीवर आहेत.
क्रॉली-डकॅट यांची तडाखेबाज सलामी
इंग्लंडच्या सलामीवीरांनी अत्यंत आक्रमक खेळी करत भारतीय गाेलंदाजीचा समाचार घेतला. झॅक क्रॉलीने ११३ चेंडूत ८४ धावा केल्या. त्याला साथ दिली बेन डकॅटने, ज्याने केवळ १०० चेंडूत ९४ धावा केल्या. त्याचे शतक ६ धावांनी हुकले. या जोडीने इंग्लंडला केवळ ३९ व्या षटकात १७५ धावांपर्यंत पोहचवले.
भारताला पहिले यश झॅक क्रॉलीच्या रूपाने मिळाले. रवींद्र जडेजाने त्याला केएल राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर बेन डकॅटला पदार्पणवीर अंशुल कंबोजने ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले.
दुसऱ्या दिवसअखेर ओली पोप ४२ चेंडूत २० धावा करून नाबाद आहे, तर अनुभवी ज्यो रूट २७ चेंडूत ११ धावा करून मैदानावर टिकून आहे.
दरम्यान, पहिल्या दिवशी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाची चांगली सुरुवात केली. त्यांनी एकमेकांना साथ देत ९४ धावांची सलामी भागीदारी रचली. राहुलने ९८ चेंडूत संयमी ४६ धावा केल्या, तर जैस्वालने ५८ धावांची दमदार खेळी साकारली. नंतर शुबमन गिल (१३) लवकरच बाद झाला.
भारत ३ बाद १४० या स्थितीत असताना साई सुदर्शन आणि ऋषभ पंत या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. साईने संयम राखत १५१ चेंडूत ७ चौकारांसह ६१ धावा केल्या. दुसरीकडे पंतने आक्रमकतेने फलंदाजी करत ४८ चेंडूत ३७ धावा करताना काही सुंदर फटकेही खेळले. मात्र ६८ व्या षटकात पंत दुखापतीमुळे ‘रिटायर्ड हर्ट’ झाला.
साई बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा मैदानात उतरला आणि त्याने शार्दूल ठाकुरसोबत भागीदारी करत दिवसाचा खेळ ४ बाद २६४ वर संपवला.
दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला अपेक्षित बळकटी देता आली नाही. केवळ ९२ धावा जोडता आल्या आणि ६ विकेट्स गमावल्या. जडेजा केवळ २० धावा करत बाद झाला. मात्र दुसऱ्या बाजूने शार्दूल ठाकुरने ८८ चेंडूत ४१ धावा करत तग धरला.
जखमी ऋषभ पंत मैदानात परतला, तेव्हा संपूर्ण स्टेडियम टाळ्या आणि शिट्ट्यांनी दुमदुमले. त्याने संयमी फलंदाजी करत ७५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावांची संघर्षमय खेळी केली. त्याच्या झुंजार खेळाने संघाला मानसिक बळ दिले.
वॉशिंग्टन सुंदरने २७ धावा केल्या, पण तो मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. पदार्पण करणाऱ्या अंशुल कंबोजला खातेही उघडता आले नाही. पंतला जोफ्रा आर्चरने बोल्ड करत इंग्लंडला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. बुमराह (४) बाद झाल्यावर मोहम्मद सिराज (५*) नाबाद राहिला आणि भारताचा डाव ३५८ धावांवर संपुष्टात आला.
कर्णधार स्टोक्सचा भेदक मारा
इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स याने ५ बळी घेतले. जोफ्रा आर्चरने ३ बळी घेतले, तर ख्रिस वोक्स आणि लियाम डॉसनने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
ऋषभ पंतचा विक्रमांचा पाऊस
बुधवारी मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना पंतला दुखापत झाली होती. ख्रिस वोक्सचा वेगवान यॉर्कर चेंडू त्याच्या पायाच्या बोटावर आदळल्याने फ्रॅक्चर झाले होते. तरी देखील तो दुखापतग्रस्त असतानाही संघाच्या मदतीला आला आणि फलंदाजी केली. त्याने ७५ चेंडूचा सामना करताना ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. यासह त्याने अनेक विक्रमांची रांग लावली.
ऋषभने धोनीला टाकले मागे
एमएस धोनीने इंग्लंडच्या भूमीवर १२ कसोटी सामने खेळताना ८ अर्धशतके झळकावली होती. मात्र, पंतने आपल्या १३व्या सामन्यात धोनीचा हा विक्रम मोडला. गुरुवारी (२४ जुलै २०२५) ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना पंतने ७६ चेंडूंमध्ये ५४ धावांची खेळी साकारली. या अर्धशतकासह त्याने धोनीला मागे टाकत इंग्लंडमध्ये ९ अर्धशतकांचा टप्पा गाठला.
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
९० – ऋषभ पंत
९० – वीरेंद्र सेहवाग
८८ – रोहित शर्मा
७८ – एमएस धोनी
७४ – रवींद्र जडेजा
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा ५० पेक्षा धावा करणारे भारतीय यष्टिरक्षक

५ – ऋषभ पंत विरुद्ध इंग्लंड, २०२५
४ – फारुख इंजिनियर विरुद्ध इंग्लंड, १९७२/७३
४ – एमएस धोनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००८/०९
४ – एमएस धोनी विरुद्ध इंग्लंड, २०१४

इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक कसोटी धावा करणारे यष्टीरक्षक

४७९ – ऋषभ पंत विरुद्ध इंग्लंड, २०२५
४६४ – अॅलेक स्टीवर्ट विरुद्ध दक्षिण आफ्रिका, १९९८
४१५ – जेमी स्मिथ विरुद्ध भारत, २०२५
३८७ – जॉनी बेअरस्टो विरुद्ध श्रीलंका, २०१६
ऋषभ पंत मालिकेतून बाहेर
ऋषभ पंतला मँचेस्टर कसोटीत पायाला दुखापत झाली आहे. ऋषभ पंतला दुखापतीनंतर त्याच्या पायाच्या बोटाला फ्रँक्चर झाले आहे, पण तरीही चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजीला उतरला. पण पाचव्या कसोटीत मात्र त्याच्या खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे त्याच्या जागी नव्या यष्टीरक्षक फलंदाजासाठी पाचारण केले आहे.५ व्या कसोटी सामन्यासाठी पंतच्या जागी तामिळनाडूचा यष्टीरक्षक-फलंदाज एन जगदीसनला भारतीय संघात स्थान मिळू शकते.

हेही वाचा