जॉर्जिया : ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिने चीनच्या लेई तिंगजी हिच्यावर नाट्यमय आणि जबरदस्त कमबॅक करत टायब्रेकरमध्ये विजय मिळवला आणि त्यामुळे आता फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ती भारताच्याच दिव्या देशमुखशी भिडणार आहे. ही अंतिम लढत शनिवारी एक दिवस विश्रांतीनंतर रंगणार आहे. विशेष म्हणजे या दोघीही खेळाडूंनी २०२६ मधील महिला कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
पहिल्या दोन नियमित वेळेतील सामने अनिर्णीत झाल्यानंतर टायब्रेकच्या पहिल्या फेरीतील (१५ मिनिट + इन्क्रिमेंट) दोन सामन्यात पुन्हा एकदा १-१ अशी बरोबरी झाली. त्यानंतर १० मिनिटांच्या सेटमध्ये लेईने आघाडी घेतली होती. हम्पीने मधल्या खेळात चुक करत मोहरा गमावला आणि कठीण एंडगेममध्ये अडकली. लेईने संयमाने आणि अचूकतेने खेळ करत हा गेम जिंकला.दुसऱ्या बाजूला दिव्या देशमुखनेही आपल्या विभागात जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. केवळ १९ वर्षीय या खेळाडूने आपल्या शैली, आत्मविश्वास आणि रणनीतीने बुद्धिबळप्रेमींना प्रभावित केलं आहे. अंतिम फेरीत ती हम्पीच्या अनुभवाला तगडी टक्कर देईल, अशी अपेक्षा आहे.
परंतु, पुढचा सामना हम्पीसाठी ‘विन ऑन डिमांड’ म्हणजेच जिंकणे गरजेचे होता. इथेच हम्पीच्या अनुभवाची कमाल पाहायला मिळाली. क्वीन मोहरा ओपनिंगने खेळ सुरू करत तिने पूर्ण वर्चस्व गाजवत सामना जिंकला.
तिसऱ्या टायब्रेक राउंडमध्ये हम्पीने पांढऱ्या मोहऱ्यांसह सुरुवात केली आणि लेईला सर्व आघाड्यांवर पराभूत केले. या विजयामुळे तिला फक्त एक बरोबरी पुरेशी होती अंतिम फेरी गाठण्यासाठी. परंतु त्यातही हम्पीने इतालियन ओपनिंगमध्ये जबरदस्त तंत्र दाखवत पुन्हा विजय मिळवला.
भारतीय बुद्धिबळात ऐतिहासिक पर्व
फिडे महिला विश्वचषक स्पर्धेसारख्या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन भारतीय महिला लढत असल्याची ही ऐतिहासिक वेळ आहे. ही केवळ अंतिम फेरी नाही, तर भारतीय बुद्धिबळ सामर्थ्याची जगासमोर असलेली ठळक साक्ष आहे. यापूर्वी हम्पीने जागतिक स्पर्धांमध्ये पदके मिळवली असली तरी वर्ल्ड कप किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप हा एकच मुकूट अद्याप तिच्या शिरपेचात नाही. यंदा ती संधी तिला पुन्हा मिळाली आहे.
अंतिम सामना शनिवारपासून
या अटीतटीच्या लढतीसाठी दोघींना एक दिवस विश्रांती मिळणार असून अंतिम लढत शनिवारपासून सुरू होणार आहे. भारतासाठी ही स्पर्धा आता केवळ पदकाची नव्हे, तर गौरवाची आणि प्रेरणेची बाब बनली आहे.