ईशान, अशांक, तिशा, आर्ना अंतिम फेरीत

मंगेशी मेजर मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th July, 12:16 am
ईशान, अशांक, तिशा, आर्ना अंतिम फेरीत

मंगेशी : येथील वागळे हायस्कूल येथे सुरू असलेल्या ७व्या मंगेशी अखिल गोवा मेजर रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत अनेक रोमांचक सामने निश्चित झाले आहेत. मुलांच्या ११ वर्षांखालील गटात अव्वल मानांकित ईशान कुलासो आणि द्वितीय मानांकित अशांक दळवी यांच्यात विजेतेपदाची लढत होईल.
मुलींच्या गटात १३ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित तिशा शेख आणि द्वितीय मानांकित आर्ना लोटलीकर यांच्यात सामना होईल. तर, १५ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित इशिता कुलासो द्वितीय मानांकित आर्ना लोटलीकरशी भिडेल.
मुलांच्या ११ वर्षांखालील गटात ईशान-अशांकचे वर्चस्व
११ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत ईशानने श्रेयस्थ राणेचा ३-० असा सहज पराभव केला. त्यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत त्याने कबीर दीक्षितलाही ३-० ने पराभूत केले होते. दुसरीकडे, अशांकने काविन हसिजा आणि आरिश शेख यांच्यावर सलग सरळ गेममध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दरम्यान, मंगिरीश विद्यादायिनी संस्था, वागळे हायस्कूल हिरक महोत्सव समिती आणि गोवा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुलींच्या १३, १५ वयोगटांत रोमांचक लढती
- १३ वर्षांखालील मुलींच्या उपांत्य फेरीत तिशा शेखने अव्वल मानांकित साची देसाईला ३-१ असा धक्का दिला, तर आर्ना लोटलीकरने संयुक्त अव्वल मानांकित आयुषी आमोणकरचा ३-२ अशा थरारक लढतीत पराभव करत अंतिम फेरीत जागा पक्की केली.
- १५ वर्षांखालील मुलींच्या गटात, इशिता कुलासोने उपांत्यपूर्व फेरीत इनारा डिसोझाला आणि उपांत्य फेरीत आयुषी आमोणकरला ३-० असे एकतर्फी पराभूत करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
- दुसरीकडे आर्ना लोटलीकरने दोन अटीतटीच्या सामन्यांतून अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने साची देसाईला ३-० असे हरवल्यानंतर, उपांत्य फेरीत काव्या खलपवर ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवला.