पहिल्या डावात भारताचा संघर्ष

अँडरसन-तेंडुलकर मालिका : करुण नायरचे अर्धशतक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
01st August, 12:18 am
पहिल्या डावात भारताचा संघर्ष

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारताच्या फलंदाजांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खराब सुरुवात केली. दिवसअखेर भारतीय संघाने ६४ षटकांनंतर ६ बाद २०४ धावा केल्या होत्या. करुण नायर ५२ तर वॉशिंग्टन सुंदर १९ धावांवर नाबाद होता.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल अवघ्या २ धावा काढून गस ॲटकिन्सनचा शिकार ठरला. के. एल. राहुलला १४ धावांवर क्रिस वोक्सने बोल्ड केले. साई सुदर्शनने काही वेळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ३८ धावांवर जोश टंगचा शिकार ठरला. भारतीय कर्णधार शुभमन गिलकडून भारतीय संघाला अपेक्षा होत्या मात्र तो २१ धावांवर धावचीत झाला. रवींद्र जडेजाने ९, तर ध्रुव जुरेलने १९ धावा केल्या. इंग्लंड संघातर्फे गस ॲटकिन्सन आणि जोश टंगने प्रत्येकी २ बळी घेतले. तर क्रिस वोक्सने १ बळी घेतला.
दरम्यान, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडून काढला आहे. यासह या संघाच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
ओव्हल कसोटीत ओली पोपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसले. दरम्यान ८२ धावांचा पल्ला गाठताच भारतीय संघाने एकाच मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडून काढला. याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघाने ३२७० धावा केल्या होत्या. आता हा विक्रम शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या नावे आहे.
शुभमन गिल हा एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. आता या बाबतीत सुनील गावस्करांना त्याने मागे टाकले आहे. गिलला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त ११ धावांची गरज होती. पाचव्या सामन्यात त्याने ११ धावा काढताच हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
शुबमन गिल हा एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. आता या बाबतीत सुनील गावस्करांना त्याने मागे टाकलं आहे. गिलला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त ११ धावांची गरज होती. पाचव्या सामन्यात त्याने ११ धावा काढताच हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

शुबमन गिलने मोडला गावस्करांचा सर्वात मोठा विक्रम
सुनील गावस्कर यांनी १९७८/७९ मध्ये सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी केली होती. कर्णधार म्हणून त्यांनी एका कसोटी मालिकेत ७३२ धावा केल्या होत्या. मात्र, आता हा विक्रम गिलने मोडला आहे. आता तो एका कसोटी मालिकेत ७३३ धावा करून कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. एवढंच नाही तर गिलने सेना देशांमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार होण्याचा मानही मिळवला.
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार
शुबमन गिल वि. इंग्लंड – ७३३* धावा (२०२५)
सुनील गावस्कर वि. वेस्ट इंडिज – ७३२ धावा (१९७८)
विराट कोहली वि. इंग्लंड – ६५५ धावा (२०१६)
भारतीय संघाने एकाच मालिकेत केलेल्या सर्वाधिक धावा
भारताचा इंग्लंड दौरा – ३२७२ धावा, २०२५
वेस्ट इंडिजचा भारत दौरा – ३२७० धावा, १८७८-७९
इंग्लंडचा भारत दौरा – ३१४० धावा, २०२४
इंग्लंडचा भारत दौरा – ३११९ धावा, १९६३-६४

करुण नायला सूर गवसला
संपूर्ण मालिकेत फॉर्मसाठी झगडणाऱ्या करुण नायरला अखेर पाचव्या कसोटीत सूर गवसला. त्याने ९२ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. तसेच त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत ५० धावांची भागिदारी करून भारताची पडझड काहीअंशी थांबविली. त्यामुळे भारतीय संघाने २०० धावांचा आकडा पार केला. करुण नायरने पहिल्या कसोटीत ० आ​णि २०, दुसऱ्या कसोटीत ३१ आणि २६, तिसऱ्या कसाेटीत ४० आणि १४ धावा केल्या होत्या. त्यामुळे चौथ्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले होते. मात्र जसप्रित बुमराहला विश्रांती दिल्यामुळे पाचव्या कसोटीत त्याला स्थान देण्यात आले आणि त्याने या कसोटीत अर्धशतक झळकावून टीकाकारांची तोंडे बंद केली.

हेही वाचा