शिवोली येथे दोन दिवसीय स्पर्धेत १५० हून अधिक युवा खेळाडूंचा सहभाग
अस्मिता वुशू वूमन्स सिटी लीगमधील विजेता फोंडा संघ.
म्हापसा : असोसिएशन ऑफ गोवा वुशू यांच्या वतीने दि. २५ व २६ जुलै रोजी शिवोली येथील सेंट फ्रान्सिस डी सालेस पूर्व प्राथमिक स्कूल सभागृह येथे आयोजित करण्यात आलेली अस्मिता वुशू वूमन्स सिटी लीग २०२५ उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत सरकारी हायस्कूल, जुना बाजार, फोंडा संघाने विजेतेपद पटकावले.
संपूर्ण गोव्यातून आलेल्या सुमारे १५० तरुण खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. विविध वयोगट व वजनगटांमध्ये सान्डा आणि ताओलू या मार्शल आर्ट प्रकारांमध्ये स्पर्धा झाल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिवोली मतदारसंघाच्या आमदार व गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षा डिलायला लोबो यांच्या उपस्थितीत झाले. पहिल्या सत्रात त्यांनी स्पर्धकांना पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करताना असोसिएशनच्या उपक्रमांचे कौतुक केले आणि राज्यातील ग्रासरुट पातळीवर वुशू खेळ प्रसारासाठी दिलेल्या योगदानाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून अॅग्नेस डायस शारीरिक शिक्षण सहाय्यक अधिकारी (क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय, कांपाल, पणजी) व राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत क्रीडापटू, तसेच डॉ. प्रशांत कदम, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी अभ्यास शाखांचे अधिष्ठाता व सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘वामनिकॉम’ मधील प्राध्यापक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विजेत्या खेळाडूंना पदके व ट्रॉफी प्रदान केल्या व त्यांच्या यशाचे अभिनंदन केले.
हा दोन दिवसांचा कार्यक्रम केवळ एक स्पर्धा नव्हता, तर तो मार्शल आर्ट्स व युवा विकासाच्या उत्सवाचे रूप होता. असोसिएशनने सर्व खेळाडू, प्रशिक्षक, शाळा व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले आणि अस्मिता वुशू सिटी लीग २०२५ यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
सांघिक निकालात फोंडा संघ ठरला सर्वोत्कृष्ट
सांघिक निकालांमध्ये सरकारी हायस्कूल, जुना बाजार, फोंडा यांनी एकूण विजेतेपद पटकावत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. जे. ए. चोपडेकर मेमोरियल हायस्कूल, आगरवाडा हे स्पर्धेत उपविजेते ठरले, तर सेंट फ्रान्सिस झेवियर्स उच्च माध्यमिक, शिवोलीला तिसरा क्रमांक प्राप्त झाला.
गोव्यात वुशू संस्कृती रुजविण्याचे उद्दिष्ट
अस्मिता वुशू वुमन्स सिटी लीग २०२५ मध्ये सहभागी झालेल्या युवा खेळाडूंची ऊर्जा, शिस्त आणि क्रीडासंस्कार पाहून आयोजक असोसिएशन ऑफ गोवा वुशू भारावून गेले आहेत. गोव्यात वुशू संस्कृती अधिक बळकट करणे, युवा खेळाडूंचा सहभाग वाढवणे आणि मार्शल आर्ट्समधील उत्कृष्टता घडवणे, हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर जारी केलेल्या निवेदनात असोसिएशनने समाधान व्यक्त केले असून या स्पर्धेमुळे गोव्यातील वुशू खेळाला नवी गती मिळाल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.