शैक्षणिक पात्रता असूनही शारीरिक शिक्षकांना समकक्ष दर्जा नाही

अन्य शिक्षकांप्रमाणे समकक्ष दर्जा देण्याची मागणी


14 hours ago
शैक्षणिक पात्रता असूनही शारीरिक शिक्षकांना समकक्ष दर्जा नाही

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पदवी व शारीरिक शिक्षण (बीपीएड) विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण असूनही शारीरिक शिक्षकांना अन्य बी.एड.धारकांप्रमाणे समकक्ष दर्जा नाही. अन्य शिक्षकांसारखाच समकक्ष दर्जा देण्याची मागणी अखिल गोवा शारीरिक शिक्षक संघटनेने केली आहे. या विषयीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व शिक्षण संचालकांना तीन वर्षांपूर्वी सादर केले होते. त्यावर आजपावेतो काहीच निर्णय झालेला नाही.
राज्यात सुमारे ५५० शारीरिक शिक्षक आहेत. त्यापैकी बरेच जण अन्य विषयही शिकवतात. शारीरिक शिक्षकांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन नंतर बीपीएड मिळवली आहे. तरीही बी.एड.धारक शिक्षकांना उच्च दर्जा आहे. याविषयी संघटनेचे अध्यक्ष चेतन कवळेकर म्हणाले, हा मुद्दो यापूर्वी विधानसभेतही आला आहे. मुख्यमंत्री आणि शिक्षण संचालकांना आम्ही निवेदन देऊन चर्चा केली आहे. बी.पी.एड. पदवी बी.एड. पदवीच्या समकक्ष असल्याचे पत्र विद्यापीठाकडून आणण्याची सूचना शिक्षण खात्याने केली होती. गोवा विद्यापीठाची बी.एड. आणि बी.पी.एड. पदवी समकक्ष आहे, असे प्रमाणपत्र गोवा विद्यापीठाने दिले आहे. शिक्षण खात्याला ते सादर केले आहेे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत बी.एड.धारक आणि बी.पी.एड.धारक शिक्षकांचा दर्जा समान आहे. गोव्यातच असमानता आहे. त्यामुळे ज्येष्ठता असूनही शारीरिक शिक्षकांक्षा मुख्याध्यापकपद मिळणे शक्य होत नाही.
बी.एड.धारक शिक्षकांएवढाच पगार शारीरिक शिक्षकांना मिळतो. शारीरिक शिक्षकांचा दर्जा अन्य शिक्षकांच्या समकक्ष करून अन्याय दूर करण्याची मागणी संघटनेने केली आहे.      

हेही वाचा