फेरीतील कर्मचाऱ्यांच्या तीन दुचाकींचे नुकसान. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल.
पणजी : चोडण ते रायबंदरदरम्यान सेवा देणारी एक फेरीबोट आज सोमवार, २३ जून रोजी सकाळी चोडण धक्क्यावर बुडाल्याची घटना घडली. आत फेरीबोटीतील कर्मचारी आणि त्यांच्या ताब्यातील तीन दुचाकी होत्या. या तिन्ही दुचाकी पाण्यात बुडाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेनंतर ‘गोवन वार्ता’च्या प्रतिनिधीने संपर्क साधताच नदी परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक माहिती दिली. योग्य दिशेने पार्क न केल्यामुळे फेरीबोटीत पाणी शिरून ती बुडाल्याचा नदी परिवहन खात्याचा प्राथमिक अंदाज आहे असे ते म्हणाले. घटनेनंतर अग्निशमन दलाने पंपांच्या मदतीने बोटीत साचलेले पाणी काढण्याचे आणि बोट पुन्हा फ्लोट करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच नदी परिवहन खात्याने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.
दैनंदिन प्रवासासाठी चोडण-रायबंदर फेरीमार्गाचा वापर करणाऱ्या शेकडो प्रवाशांसाठी नदी परिवहन खात्याने एकूण पाच फेरीबोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. यापैकी आज दुर्घटनाग्रस्त झालेली फेरीबोट वगळता उर्वरित चार बोटी सुरळीतपणे कार्यरत होत्या. त्यामुळे प्रवाशांचा वाहतुकीत फारसा अडथळा झाला नाही.