दामू नाईक यांचा पुनरुच्चार : निवडणूक निकालावर तुलना चुकीची
मडगाव : निवडणूक जिंकणे व हरणे हे त्यावेळच्या राजकारणाच्या रचनेवरही अवलंबून असते. त्यावरून तुलना होऊ शकत नाही. आमदार झाल्यानंतर मतदारसंघात कोणती कामे केली यावर तुलना होत असते. फातोर्डा जिंकल्यानंतर केलेल्या विकासकामांवर बोला, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आमदार विजय सरदेसाई यांना केले आहे. ‘सिग्नेचर प्रकल्प’ दाखवण्याचे आव्हान अजूनही कायम असल्याचे म्हटले.
मडगाव रवींद्र भवनातील कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, कामांच्या तुलनात्मक चर्चेसाठी अजूनही तयार आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न नको, असा पुनरुच्चार केला आहे. मतदारसंघांची पुनर्रचना झाली व फातोर्डातील काही भाग कुडतरी व काही भाग मडगाव मतदारसंघात समाविष्ट झाला. अल्पसंख्याक व बहुसंख्याक यांच्यातील गणितातही आपण मते मिळवली असून त्यात दरवेळी वाढ झाली आहे.
अल्पसंख्याक समाजाच्या मतदारसंघात जसे नुवे, कुडतरी, बाणावली, वेळ्ळीत भाजप पोहचू शकले नाही, कारण तेथील समाजाला समजावण्यात आम्ही कमी पडलो आहोत. अल्पसंख्याक जास्त असले तरीही फातोर्डात निवडणूक लढवली. तिन्ही निवडणुकांत मतांमध्ये वाढ झाली आहे.
फातोर्डातील विकास आमदाराने केला नाही तर सरकारने केला आहे. आधीच्या आमदाराने विकासकामांचा केलेला पाठपुरावाही तेवढाच आहे. दुसऱ्याच्या कामांचे श्रेय आपण कधीही घेतलेले नाही. मात्र, आताचे आमदार फातोर्डात नसलेल्या प्रकल्प व्हिडिओत दाखवून श्रेय घेत आहेत, असे नाईक म्हणाले.
आश्वासने पूर्ण का केली नाहीत?
फातोर्डातील शेतकऱ्यांना शेतजमिनी परत करणार, असे आश्वासन आपण दिले नाही, तर ते विजय सरदेसाई यांनी दिले आहे. त्यानंतर ते सरकारात होते, उपमुख्यमंत्री झाले, दोनदा सहकारी मंत्री झाले त्यावेळी त्यांनी शेतजमिनी परत का केल्या नाहीत, असा सवाल दामू नाईक यांनी सरदेसाई यांना केला.
फातोर्डाबाबत योग्यवेळी योग्य भूमिका घेणार
भाजपचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने कार्यकर्त्यांना प्रेरणा देताना सर्व मतदारसंघात मेळावा करणे हे आपले काम आहे. फातोर्डात कायम आपल्याला उमेदवारी असेल असे नाही. योग्य वेळ आल्यावर योग्य भूूमिका घेतली जाईल, असे नाईक यांनी सांगितले.
दुसऱ्याने केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नये
भूमिगत वीज वाहिन्या, सांडपाणी वाहिन्या, ११ नाल्यांची बांधणी, आर्लेम ते रवींद्र भवन रस्त्यासाठी भूअधिग्रहण, घोगळातील तळी असे प्रकल्प कधी सुरू झाले त्याची माहिती घ्यावी. आमदार सरदेसाई यांनी दुसर्यांच्या कामांचे श्रेय न घेण्याचा सल्ला दामू नाईक यांनी दिला.