लवकरच होणार डिजिटायझेशन
पणजी : गोव्यात असलेल्या ऐतिहासिक हस्तलिखितांचा (मॅन्युस्क्रिप्ट) शोध घेण्यासाठी १ जुलैपासून सर्वेक्षण मोहीम सुरू होत आहे. पुराभिलेख आणि पुरातत्व खात्याच्या वतीने ही मोहीम राबवली जाणार असून, हस्तलिखितांचे जतन व डिजिटायझेशन करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती संचालक बालाजी शणै यांनी दिली.
या सर्वेक्षणामध्ये देवस्थान समित्या, शैक्षणिक संस्थांतील शिक्षक, तसेच इतिहास संशोधक आणि इतर व्यक्ती यांच्याकडे असलेल्या हस्तलिखितांची माहिती संकलित केली जाईल. त्या अनुषंगाने संबंधितांशी प्रत्यक्ष भेटी घेऊन माहिती गोळा केली जाणार आहे.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित हस्तलिखितांची जबाबदारी पुरातत्व खात्याकडे सोपवली जाईल आणि त्यांचे डिजिटायझेशनचे काम अधिकृतपणे हाती घेतले जाईल. याआधी सरकारकडून जुन्या नोंदी, दस्तऐवज आणि इतर ऐतिहासिक कागदपत्रांचे डिजिटायझेशन सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद केली असून, राज्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.