सासष्टी : निवडणूका जिंकल्यानंतर फातोर्ड्यात केलेल्या विकासकामांवर बोला

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे आमदार सरदेसाईंना आव्हान.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
22nd June, 02:11 pm
सासष्टी : निवडणूका जिंकल्यानंतर फातोर्ड्यात केलेल्या विकासकामांवर बोला

मडगाव : फातोर्डा मतदारसंघात कोणती विकासकामे केली, यावरच आमदाराची खरी गुणवत्ता ठरते. दुसऱ्याने केलेल्या कामांचे श्रेय घेणे म्हणजे जनतेची दिशाभूल आहे. आजच्या तरुण पिढीला हे सत्य समजणे गरजेचे आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला.



मडगाव येथील रवींद्र भवनात झालेल्या एका कार्यक्रमानंतर दामू नाईक माध्यमांशी बोलत होते. मतदारसंघात कोणती कामे केली त्यावरच खरा हिशेब ठरतो. निवडणूक जिंकणे-हरणे हे त्या वेळच्या राजकारणावर अवलंबून असले तरी विकासकामांची तुलना हवीच.  फातोर्डा मतदारसंघात भाजपने मागील निवडणुकांमध्ये सतत मतवाढ नोंदवली आहे. अल्पसंख्याकबहुल भागांमध्ये पोहोचण्यात आम्ही काहीसे कमी पडलो, हे मान्य आहे. पण पळपुटेपणा न करता निवडणुका लढवल्या असेही ते म्हणाले. 

सध्या फातोर्ड्यातील काही विकासकामांचे श्रेय सरदेसाई घेत आहेत. मात्र, भूमिगत वीजवाहिन्या, सांडपाणी यंत्रणा, ११ नाले, आर्लेम ते रवींद्र भवन रस्ता, घोगळ तळी प्रकल्प यासारखी अनेक कामे माझ्या अथवा पूर्वीच्या सरकारच्या काळात सुरू झाली होती. त्या कामांचाही पाठपुरावा आम्हीच केला. दुसर्‍याच्या कामांचे श्रेय आपण कधीही घेतलेले नाही. मात्र, आताचे आमदार फातोर्ड्यात नसलेल्या प्रकल्प व्हिडिओत दाखवून श्रेय घेत आहेत असे दामू नाईक म्हणाले. 

शेतजमिनींच्या आश्वासनावर टीका

शेतकऱ्यांना जमिनी परत देण्याचे आश्वासन मी नाही, तर विजय सरदेसाईंनी दिलं होतं. ते उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे दोन मंत्रीही होते. त्यावेळी जमिनी परत का दिल्या नाहीत? सत्तेत असताना काम न करता आता फसव्या आश्वासनांचे राजकारण करणे योग्य नाही, असे नाईक म्हणाले. काही गोष्टी बेकायदेशीरपणे घडत असल्यास असल्यास आवाज उठवला पण वैयक्तिक टीका कधीही केली नाही, असेही ते सांगितले.

फातोर्ड्यात पुढील निवडणुकीत उमेदवारी माझीच असेल, असे मी म्हणत नाही. मात्र पक्षप्रमुख म्हणून सर्व मतदारसंघांत मेळावे घेणे, कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा जागृत करणे हे माझे कर्तव्य आहे. फातोर्ड्याबाबत योग्यवेळी योग्य भूमिका घेतली जाईल, असेही दामू नाईक यांनी सांगितले

हेही वाचा