एसटी समाजाचे नेते असल्याने सर्वप्रथम शपथविधीचे संकेत
पणजी : गोव्यात रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी विविध नावांची चर्चा सुरू असली, तरी विधानसभा सभापती रमेश तवडकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तवडकर हे अनुसूचित जमाती (एसटी) समाजाचे नेते असल्याने, त्यांचाच शपथविधी सर्वप्रथम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या संदर्भात मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्रिपदाबाबत पक्ष किंवा मुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही, असे सभापती तवडकर यांनी म्हटले आहे. गोविंद गावडे यांचे मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, त्याचप्रमाणे तवडकर यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चाही गेल्या काही काळापासून सुरू आहे. सध्या एकच मंत्रिपद रिक्त असल्यामुळे, सुरुवातीला एकाच मंत्र्याचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गोमंत विभूषण पुरस्कारासाठी विशेष निमंत्रण
या चर्चेला आणखी बळ देणारी बाब म्हणजे, २४ जून रोजी कला अकादमीमध्ये होणाऱ्या गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान समारंभासाठी सभापती तवडकर यांना सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत कला आणि संस्कृती मंत्री उपस्थित असतात, तर सभापतींना सहसा आमंत्रित केले जात नाही. मात्र, यंदा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह सभापती तवडकर यांनाही निमंत्रित करण्यात आल्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या संभाव्य नियुक्तीबाबतच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.