म्हापसा उपनिबंधक कार्यालयाच्या लिफ्टमधील प्रकार
म्हापसा : मरड म्हापसा येथील उपनिबंधक कार्यालय असलेल्या एसआर इमारतीमधील लिफ्ट बंद पडल्याने सात वर्षीय मुलासमवेत अॅड. कळंगुटकर पती पत्नी अडकले. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर या कुटुंबाला बाहेर काढण्यात यश आले.
ही घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. एसआर बिल्डिंगच्या दुसर्या मजल्यावर अॅड. सर्वेश कळंगुटकर व अॅड. मिनल कळंगुटकर यांचे कार्यालय आहे. ते मुलासमवेत सायंकाळी चहा घेण्यासाठी इमारतीमधून खाली आले होते. परत कार्यालयात जाताना अचानक शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा बंद झाला. काही मिनिटांनी वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, लिफ्ट बंद पडली व कळंगुटकर कुटुंब लिफ्टमध्ये अडकले.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शाहीद खान, सूरज शेटगावकर, जयेश कांदोळकर, स्वप्नेश कळंगुटकर, दिप्तेश गावडे, परेश मांद्रेकर, साईदत्त आरोलकर, भगवान पाळणी या दलाच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ते शक्य झाले नाही. लिफ्टची देखभाल पाहणार्या जीएसआयडीसीच्या टेक्निशीयन कर्मचार्यांना पाचारण करण्यात आले. दोन तासांनी ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनाही लिफ्ट सुरू करण्यास शक्य झाले नाही. शेवटी त्यांनी लिफ्ट खेचून खाली घेतली आणि अग्निशमन दलाच्या मदतीने दरवाजा ओढून अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले. अडीच तासांनी त्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
वारंवार लिफ्ट बंद पडण्याचे प्रकार
ही लिफ्ट खास उपनिबंधक कार्यालयात ये जा करणार्या लोकांसाठी सरकारने जीएसआयडीसीच्या मार्फत उभारलेली आहे. याचा वापर इमारती मधील इतर व्यावसायिकही करतात. वारंवार ही लिफ्ट बंद पडण्याचे प्रकार घडत असून यापूर्वीही लोक लिफ्टमध्ये अडकून पडलेले आहेत.