नागरिकांची मागणी : प्रभागनिहाय पाहणीअंती प्लानमध्ये बदल
मडगाव : ‘मडगाव मास्टरप्लान २०४१’चा आराखड्याबाबत पालिकेत झालेल्या सादरीकरणावेळी नागरिकांकडून प्लानला विरोध झाला. ओडीपीच्या आराखड्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यावर आधारित प्लान वस्तुनिष्ठ ठरणार नाही. त्यामुळे प्रभागनिहाय पाहणी करुन लोकांच्या सूचनांनुसार बदल करून मास्टरप्लान तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
मडगाव पालिकेकडून सभागृहात गुरुवारी सकाळी मडगाव मास्टरप्लान २०४१सादरीकरण करण्यात आले. यावेळी स्टुडिओ पॉड या कन्सल्टन्सीच्या महेश वाघधरे यांनी मडगावचा मास्टरप्लान पीपीटीद्वारे सादर केला. या सादरीकरणावेळी केवळ वरवर फोटो व नकाशा दाखवून माहिती देण्यात आली असता, कोणत्या ठिकाणी काय होणार व त्यासाठी कोणत्या प्रकारची पाहणी केली याची माहिती देण्याची नागरिकांकडून मागणी झाली. या सादरीकरणावेळी नागरिकांचे प्रश्न वाढू लागताच नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी मध्यस्थी करत आधी सादरीकरण पूर्ण करू देण्याची विनंती केली. सादरीकरण पूर्ण झाल्यावर लोकांनी केलेल्या प्रश्नांवर उत्तरे देताना कन्सल्टन्सीकडून सांगण्यात आले की, ओडीपीनुसार हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यापूर्वी मडगावातील हॉटेलमध्ये काहीजणांना मास्टरप्लानची थोडीशी कल्पना देण्यात आली होती.
युनायटेड गोवन्सचे आशिष कामत यांनी सांगितले की, मास्टरप्लान असावा असे मडगाववासीयांनाही वाटते. प्राधान्यक्रमाने करायच्या प्रकल्पांसाठी १२० कोटींचा खर्च येणार आहे, पण सध्या जे दाखवण्यात आले ती केवळ स्वप्ने आहेत. ज्या ओडीपीच्या आधारावर हे सादरीकरण करण्यात आले, त्या ओडीपीत त्रुटी असून त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मडगावातील रस्त्यांची, सांडपाणी वाहिनी, भूमिगत वाहिनी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प याबाबतच्या योग्य माहितीशिवाय प्लान करण्यात आल्याने हा प्लान कामाचा नाही. झोपडपट्टीबाबत काय निर्णय घेणार याची माहिती नाही.
साविओ कुतिन्हो म्हणाले, कन्सल्टंसीकडून काम हाती घेतल्यानंतर कोणत्या कामांना मंजुरी मिळाली याची माहिती घेण्यात आलेली नाही. मडगावात फिरुन योग्य माहिती घेऊन, पाहणी करुन हा मास्टरप्लान तयार केलेला नाही. वेगवेगळ्या मंडळांकडून करण्यात येत असलेली कामे, अतिक्रमणे याची माहिती घेण्यात यावी.
प्रदीप नाईक यांनी सांगितले की, मडगावातील नैसर्गिक पाणी वाहण्याच्या जागा, सांडपाणी वाहिनी, शहराअंतर्गत वाहतूक कोंडी, पार्किंगची सोय, कचरा व्यवस्थापन यावर या मास्टरप्लानवर लक्ष देण्याची गरज आहे. तर काहीजणांनी होली स्पिरिट चर्चनजीक दाखवण्यात आलेल्या रस्त्यावरुन कन्सल्टंटला प्रश्न करताना वारसास्थळे कशाप्रकारे सांभाळली जाणार व कोणत्या जागेवर कशाप्रकारची सुविधा उपलब्ध होणार याची पूर्ण माहिती मास्टरप्लानमधून देण्याची मागणी केली.
कन्सल्टंटकडून पुढील महिन्यात प्रभागनिहाय माहिती घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. तरीही जीसुडाकडून कन्सल्टंसी नेमण्यात आलेली असल्याने त्यांना विचारुन पुढील निर्णय होणार आहे.
शेतजमिनींबाबत काहीच नाही!
मडगाव व फातोर्डा येथील शेतजमिनींवरील प्रकल्पाबाबत आराखड्यात काहीही नमूद नाही. त्यावर सध्या विचार करण्यात आलेला नसल्याचे कन्सल्टंटकडून सांगण्यात आले. यावर नागरिकांनी शेतजमिनींवर प्रकल्प नको, अशी मागणी केली.
जागेअभावी नागरिक माघारी
मास्टरप्लानच्या सादरीकरणासाठी मडगावातील नागरिकांची गर्दी झाली होती. सादरीकरण सुरू झाले तरीही लोकांचे येणे सुरूच होते. सभागृहात जागा न मिळालेल्यांसाठी बाहेर काही खुर्च्यांची सोय केली होती. पण काही ऐकू व दिसत नसल्याने लोकांनी माघारी परतणे योग्य मानले.