मडगाव पालिका निवडणुकीत उमेदवार उभे करणार : आमदार सरदेसाई

वाढदिन उत्साहात : कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा


14th June, 11:38 pm
मडगाव पालिका निवडणुकीत उमेदवार उभे करणार : आमदार सरदेसाई

वाढदिवसानिमित्त आमदार विजय सरदेसाई यांना पुष्पगुच्छ देताना माजी आमदार किरण कांदोळकर. सोबत माजी मंत्री दयानंद मांद्रेकर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : फातोर्डा मॉडेल हे होममेड मॉडेल आहे. मडगाव पालिका राखण्यासाठी त्याचा ताबा घेण्याची गरज आहे. त्यासाठी मडगावातूनही पालिका निवडणुका लढवणार. समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन सक्षम उमेदवार देण्यात येतील. मतविभागणीचा फायदा भाजपला मिळू नये यासाठी सर्वांनी एकत्रित आल्यास यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन आमदार विजय सरदेसाई यांनी केले.
फातोर्डा येथे आमदार विजय सरदेसाई यांचा ५५वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा, माजी आमदार नरेश सावळ, दयानंद मांद्रेकर, फा. व्हिक्टर फेर्रांव, राधाराव ग्रॅसियस, नाटककार राजदीप नाईक, तियात्रिस्त प्रिन्स जॅकोब, किरण कांदोळकर, दुर्गादास कामत यांच्यासह गोवा फॉरवर्डचे राज्यभरातील कार्यकर्तेही उपस्थित होते. कार्यक्रमावेळी तियात्रिस्तांसह इतर कलाकारांनी कलांचे सादरीकरण केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार विजय सरदेसाई पुुढे म्हणाले की, लोकांचे हित पाहून फातोर्डाचा विकास केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अनेक पक्षांचे उमेदवार उभे राहिले. मते विभागली गेली व त्याचा फायदा भाजपला झाला. कॅ. विरियातो हे लोकांमुळे निवडून आले, काँग्रेसमुळे नाही. गोंयकारपण राखण्यासाठी थोडे हातचे सोडण्याचीही गरज आहे. काँग्रेसने ‘नको’ म्हटल्याने आपण पर्रीकरांसोबत गेलो होतो; पण पक्ष विलीन केला नाही. लोकांचे म्हणणे ऐकून नंतर भाजपसोबत गेलो नाही. गोवा सांभाळण्यासाठी काँग्रेसने लवकर झोपेतून उठण्याची गरज आहे. पुढील वर्षभरात राज्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या जातील. प्रत्येक भागातील समस्या जाणून घेऊन अजेंडा फॉर गोवा तयार केला जाईल.
नरेश सावळ यांनी सांगितले की, सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठ हे सर्वपक्षीय झाले आहे. सरदेसाईकडे राज्य सांभाळण्याची क्षमता आहे. ती जबाबदारी त्यांनी घ्यावी. जुझे फिलीप म्हणाले, आमदार विजय सरदेसाई हे लोकांसाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व आहे. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून विजय सरदेसाई पुढे येतील. फा. व्हिक्टर फेर्रांव यांच्यासह अन्य मान्यवरांकडूनही विजय सरदेसाई यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
पुढील वाटचालीसाठी लवकर निर्णय घ्या : राधाराव ग्रासियस
कार्यक्रमावेळी अ‍ॅड. राधाराव ग्रासियस यांनी सांगितले की, जे काम हाती घेतले ते पूर्ण करण्याची ताकद विजय यांच्यात आहे. राज्यात सर्व लोकांनी एकत्रितपणे काम केल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे शक्य आहे, हे लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. काँग्रेसकडे नेतृत्व नसल्याने त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण होणे शक्य नाही. काँग्रेसच्या भरवशावर न राहता विजय सरदेसाई यांनी पुढील वाटचालीसाठी लवकर निर्णय घ्यावा.      

हेही वाचा